Badlapur School Case :  ठाणे जिल्ह्यातील बदलापूर (Badlapur Case) येथे दोन चिमुरडींवर झालेल्या अत्याचाराने सगळा महाराष्ट्रच हादरला आहे. बदलापूरमधील चिमुरडीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या प्रकरणातील आरोपी, हे प्रकरण बाहेर येऊ न देणाऱ्यांनाही शिक्षा करावी या मागणीसाठी मंगळवारी बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. स्थानिकांच्या आक्रोशासमोर प्रशासन हतबल दिसून आले. या सगळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. 


अभिनेता किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचा संदर्भ देत टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना म्हटले की, "चार महिन्यापुर्वी महाराष्ट्रात एका आरोपीने बलात्कार केला होता. आम्ही फास्ट ट्रॅक खटला चालवला. दोन महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्‍यांच्या या दाव्यावरच किरण माने यांनी आक्षेप घेतला आहे. 






किरण माने यांनी बुधवारी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की,  मुख्यमंत्री आज भाषणात म्हणाले, "चार महिन्यापुर्वी महाराष्ट्रात एका आरोपीने बलात्कार केला होता. आम्ही फास्ट ट्रॅक खटला चालवला. दोन महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा झाली." इतकी जबरदस्त थाप मारलेली मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकली ! कुणी सांगू शकेल का गेल्या चार महिन्यात महाराष्ट्रात कुणाला फाशीची शिक्षा झालेली आहे??? इतक्या संवेदनशील विषयावर अशी थापेबाजी करणारा नराधम 'माणूस' म्हणवुन घ्यायच्या लायकीचा नाही ! 



किरण माने यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री पदाची गरिमा आज ढासाळताना दिसत आहे. बदलापूर घटनेवर मुख्यमंत्री महोदयांनी असं बोलणं शोभत नसल्याचे एका नेटकऱ्याने म्हटले. अशा चुकीच्या वक्तव्यावर कायद्याने कारवाई करू शकतो, का असा प्रश्नही एकाने विचारला आहे. 


बदलापूरमध्ये अक्षय शिंदेच्या घरी तोडफोड


बुधवारी बदलापूरमध्ये अक्षय शिंदे राहत असलेल्या खरवई गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले. अक्षय शिंदे खरवईपासून काही अंतरावर असलेल्या एका चाळीत राहतो. ग्रामस्थांनी बुधवारी त्याच्या घरात शिरत कुटुंबीयांना बाहेर काढले आणि घरातील सामानाची तोडफोड केली. यानंतर गावकऱ्यांनी अक्षय शिंदे याच्या कुटुंबीयांना घरातून हुसकावून लावत गाव सोडण्यास भाग पाडले. अक्षय शिंदे याचे कुटुंब मूळचे कर्नाटकातील गुलबर्गा या गावातील आहे. अक्षयचा जन्म खरवई गावात झाला होता. तो याठिकाणी असणाऱ्या एका चाळीत आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील आणि एक भाऊ असे तिघेजण आहेत.


इतर संबंधित बातमी :