मुंबई: मी जे बोलतो ते करतो. मराठा समाजाला मी स्वत:, आम्ही आरक्षण देणार आहे. मराठ्यांना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले जाईल, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. ते गुरुवारी महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांना मनोज जरांगे (Manjoj Jaragne Patil) यांच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीसमोर मनोज जरांगे यांच्या रुपाने मराठा समाजाचं मोठं आव्हान असेल. त्याचा सामना कसा करणार, असे एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले. त्यावर एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका रोखठोक शब्दांत स्पष्ट केली.


हे बघा आम्ही जे बोलतो ते करतो. मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देणार, तेदेखील ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता. मी दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करुन मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतली. त्यानंतर तात्काळ विधानसभेचं अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, ते आरक्षण कोणी घालवलं, ते त्यांना कोर्टात टिकवता आले नाही.  आतादेखील आम्ही आरक्षण दिले आहे, ते रद्द करण्यासाठीही आटापिटा सुरु आहे, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला.


मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचा सल्ला


दुसरी गोष्ट म्हणजे मराठवाड्यात कधी कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते. आम्ही जस्टीस शिंदे कमिटी स्थापन केली. इतकी वर्षे ज्यांच्या हातात संधी होती, सत्ता होती, त्यांनी कधी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. फक्त मतांसाठी मराठा समाजाचा वापर केला. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरले. पण त्यांनी हा विचार केला पाहिजे की, महायुतीने काय काय दिलं,सारथी दिलं, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ दिलं. ओबीसी समाजाप्रमाणे मराठ्यांना सवलती देण्यात आल्या. हे सगळं कोणी केलं? मराठा समाजाला कोणी वंचित ठेवलं आणि कोणी दिलं, याचा विचार मनोज जरांगे यांनी करायला पाहिजे, असे एकनाथ शिंदे  म्हटले. 


फक्त शिंदे साहेब मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात: जरांगे पाटील


एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातली पत्रकार परिषदेत याबाबत भाष्य केले. जरांगे पाटील यांनी म्हटले की, मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात तर मराठ्यांना फक्त शिंदे साहेब. तेवढाच धाडसी माणूस आहे जो, मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.



आणखी वाचा


लाडकी बहीण योजनेचा प्रतिसाद पाहून विरोधक गडबडलेत; महायुतीचं रिपोर्ट कार्ड मांडत अजित पवारांचं टीकास्त्र