मुंबई: महायुती सरकारच्या योजना जनतेमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रतिसाद पाहून विरोधक घाबरले आहेत, असं म्हणणार नाही, पण विरोधक योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून गडबडले आहेत, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. गेल्या दोन वर्षांमध्ये महायुती सरकारने जनतेच्या आयुष्यात बदल घडवून आणला आहे. महिला, उद्योग, रोजगार अशा विविध क्षेत्रात सरकारने अविरत मेहनत घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ते बुधवारी महायुती सरकारच्या (Mahayuti) संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी महायुती सरकारचे गेल्या दोन वर्षातील कामगिरीचे रिपोर्ट कार्ड सादर करण्यात आले.


या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडताना विरोधकांना टोले लगावले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतंर्गत पाच महिन्यांत महिलांना पैसे देण्यात आले आहेत. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. लाडक्या बहि‍णींच्या आयुष्यातील सकारात्मक बदल विरोधकांच्या पचनी पडत नाही. मी जबाबदारीने सांगतो की, लाडकी बहीण योजनेसाठी आधी 10 हजार कोटी नंतर 35 हजार कोटींची तरतूद केली आहे. ही योजना तात्पुरती नाही. हे पैसे तुमचा अधिकार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या पैशात वाढ करण्याचं सुतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्याबद्दल आम्ही विचार करत आहोत, असे अजित पवार यांनी सांगितले.  


विरोधक फेक नरेटिव्ह सेट करु पाहत आहेत: अजित पवार


राज्यातील विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. आता काही लोक फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला भाजप आणि शिवसेनेचं सरकार स्थापन झालं.त्यानंतर वर्षभराने आम्ही सरकारमध्ये सामील झालो. दीड वर्षे आम्ही सगळे काम करत आहोत. त्याचा लेखाजोखा आम्ही रिपोर्ट कार्डमधून मांडत आहोत. 


निवडणुकीपूर्वीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बरेच निर्णय होतात. त्याचे काही कारण देता येत नाही. सरकार राहिलेले सर्व निर्णय या काळात वेगाने घेते. पण आम्ही सर्व योजना विचारपूर्वक सुरु केल्या आहेत. अर्थसंकल्पात योजनांची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी त्याची टिंगलटवाळी केली. आमची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली. आम्ही या माध्यमातून गरीब महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. यावरुन विरोधक सुरुवातीला पैसे येणार नाहीत, असा प्रचार करत होते. नंतर म्हणाले आलेले पैसे काढून घ्या, अन्यथा सरकार परत काढू घेईल. विरोधकांना आरोप-प्रत्यारोपाचा अधिकार आहे. पण हे करताना विरोधकांनी थोडफार तारतम्य बाळगलं पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले. 


आणखी वाचा


स्थगिती सरकार गेल्यावर गती आणि प्रगतीचे सरकार राज्याने पाहिले: फडणवीस