Uddhav Thackeray & Raj Thackeray Alliance: गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार, अशा जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु होत्या. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या एका खेळीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील या सर्वात मोठ्या फँटसीचा विचका होण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे गट आणि मनसे (MNS) यांच्यातील युतीसाठी चांगली राजकीय वातावरणनिर्मिती झाली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. मुंबईच्या वांद्रे परिसरातील ताज लँडस एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. गेल्या अर्ध्या तासापासून या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. त्यामुळे ही भेट म्हणजे ठाकरे गट आणि मनसे यांच्याती युतीला कायमचा ब्रेक लावणारी ठरणार का, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या कलानगर येथील मातोश्री या निवासस्थानापासून काही अंतरावरच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट पार पडली. कलानगर ते ताज लँडस एन्ड या हॉटेलपर्यंतेच अंतर जेमतेम साडेसहा किलोमीटर इतके आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्राऊंड लेव्हलला ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलनाचे अनेक प्रसंग पाहायला मिळाले होते. दोन्ही पक्षांचे प्रमुख नेतेही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याविषयी सकारात्मक बोलताना दिसत होते. त्यामुळे ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता कधी नव्हे इतकी वाढली होती. त्यामुळे आता मनसे-ठाकरे गटाची युती होणारच या आनंदात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते मश्गुल होते. हे सर्वजण गाफील असताना चाणाक्ष देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगले राजकीय संबंध निर्माण झाले आहेत. गेल्या काही काळात या दोन्ही नेत्यांच्या अनेक भेटीगाठी झाल्या आहेत. मात्र, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी हातमिळवणी केली असती तर मुंबईतील राजकारणात मोठे बदल झाले असते. या दोन्ही नेत्यांना मानणारा मोठा वर्ग मुंबई, नाशिक, ठाणे या शहरी भागांमध्ये आहे. या एकत्रित ताकदीचा परिणाम आगामी महानगरपालिका निवडणुकीवर होऊ शकतो. ही गोष्ट ओळखूनच देवेंद्र फडणवीस यांनी आता राज ठाकरे यांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरु केल्याची चर्चा आहे.
आणखी वाचा