Shinde Group Vs Thackeray Group: ठाण्यातील किसान नगर येथे शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. ठाकरे गटाकडून ठाण्यात मेळावा घेण्यात आला. यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते योगेश जानकर त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत मेळाव्याच्या ठिकाणी आल्याने दोन्ही गटात वाद होऊन हाणामारी झाली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे देखील घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते हे हाणामारी करताना दिसत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, आज किसान नगर भागात ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ठाण्यातील हा भाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील भाग मानला  जातो. हा भाग शिंदे यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण येथूनच त्यांना सर्वाधिक मतदान होतं. याच ठिकाणी ठाकरे गटाने आज मेळावा घेतला. येथील ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी हा मेळावा आयोजित केला होता. त्याठिकाणी अचानक शिवदे गटाचे काही माजी नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते आले. यानंतर दोन्ही गटामध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन वाद झाला. यानंतर या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. ज्यावेळी ही हाणामारी होतं होती, त्यावेळी राजन विचारेही घटनास्थळी उपस्थित होते. यासोबतच या ठिकाणी केदार दिघे हे देखील उपस्थित होते. तसेच शिंदे गटाकडून माजी नगरसेवक योगेश जानकर येथे उपस्थित होते. 


याप्रकरणी स्थानिक पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद केली जात आहे. या हाणामारीत दोन जणांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघेही ठाकरे गटाचे कार्यकर्ते असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र ही हाणामारी नेमक्या कोणत्या वादातून झाली. तसेच अचानक शिंदे गटाचे कार्यकर्ते याठिकाणी कशामुळे आले, याचा पोलीस तपास करणार आहे. 


नरेश मस्के यांनी सांगितली शिंदे गटाची बाजू 


या घटनेबाबत बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के म्हणाले आहेत की, ठाकरे गटाचा तिथे मेळावा नव्हता. त्या ठिकाणी वाढदिवसाचा एक कार्यक्रम होत होता. आमचे कार्यकर्ते केक कटिंग होत असता तिथे उपस्थित होते. यावेळी राजन विचारे यांच्यासोबत 20 -25 कार्यकर्ते होते. त्यांनी आमच्या नगरसेवकाला चुकीच्या पद्धतीने, 'तू इथं काय करतोय, कशासाठी आलायस.', असं म्हणत धक्काबुकी करण्याचा प्रयत्न केला. त्यामधून बाचाबाची झाली आणि हा प्रकार घडलेला आहे.