मुंबई :  शिवसेनेने शरद पवारांबरोबर आघाडी केली आहे. परंतु शरद पवार यांची संयमी वृत्ती शिवसेनेने स्वीकारली नाही. अजूनही शिवसेनेची संकुचित वृत्ती आहे. त्यामुळे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या पाठशाळेत शिकवणी लावावी असा सल्ला भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे. ते आज रत्नागिरीत एबीपी माझाशी बोलत होते.


राजकीय कुहेतूने सिंधुदुर्गात जमावबंदी
भाजप नेते आशिष शेलार यांनी सिंधुदुर्गामध्ये लावण्यात आलेल्या जमावंबदीच्या आदेशावरुन शिवसेनेवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, "नारायण राणे हे कोकणचे सुपुत्र आहेत, परंतु त्यांचा सिंधुदुर्ग दौरा आल्यामुळे राजकीय हेतूने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. सामान्य माणूस नारायण राणे यांना भेटू नये. यासाठी ठाकरे सरकारने कुहेतूने जमावबंदीचा आदेश लागू केला."


ज्यांना जी भाषा कळते त्याच भाषेत उत्तर
नारायण राणे यांनी शिवसेनेला ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत उत्तर दिलं असं सांगत आशिष शेलार यांनी संजय राऊत यांनाही टोला लगावला. भाजपाचे मूळ नेते खालच्या शब्दात टीका करणार नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं त्याला अशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे.


आशिष शेलार यांचा मुख्यमंत्र्यांनाही टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जुन्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा असं म्हणत नारायण राणे यांचे नाव न घेता टीका केली होती. त्यालाही अशिष शेलार यांनी उत्तर दिले आहे. ज्याची जशी संस्कृती आहे तसे शब्द वापरले जात आहेत असं म्हणत शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे.


शरद पवार यांची पाठशाळा लावावी
शरद पवार यांना एका माथेफिरूने मारहाण केली होती. त्यावेळी शरद पवार यांनी संयमी वृत्ती दाखवली आणि माफ केलं होतं. शिवसेनेनं शरद पवारांसोबत आघाडी केली आहे. परंतु त्यांची संयमी वृत्ती शिकली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याकडून संयम शिकला पाहिजे. त्यासाठी शरद पवार यांची पाठशाळा सुरू करावी असा टोला शेलार यांनी लगावला आहे.


महत्वाच्या बातम्या :