Ambadas Danve on Amit Shah: उद्धव ठाकरे बरोबर बोलले, अमित शहा हे अहमदशहा अब्दालीच असं म्हणत देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त झाले असल्याचं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलंय. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेपूर्वी राजकीय घटनांना वेग आला असून छत्रपती संभाजीनगरमधून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अमित शहांसह देवेंद्र फडणवीस, सचिन वाजे आणि अब्दुल सत्तारांवरही जोरदार निशाणा साधल्याचं दिसतंय. 


अमित शहा हे अहमदशहा अब्दालीचे वारसदार असल्याची जोरदार टीका अंबादास दानवे यांनी केली असून सैन्य, सत्ता आणि पैसा असतानाही अब्दालीला अधिक सत्ता आणि पैसा हवा होता. त्याचंही पोट मोठं होतं, तसंच अमित शहांचं असल्याचं दानवे म्हणाले.


अब्दालीसारखंच अमित शहांचं पोट मोठं


विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी गृहमंत्री अमित शहांवर जोरदार निशाणा साधल्याचे दिसून येत आहे. ते म्हणाले , उद्धव ठाकरे बरोबर बोलले अमित शहा हे अहमदशहा अब्दालीच. अब्दाली हा एक आक्रमक होता. सत्ता होती, सैन्य होतं तरीही त्याला आणखी सत्ता पाहिजे होती. पैसा पाहिजे होता. त्याचं पोट मोठं होतं तसंच अमित शहा यांचे देखील असल्याचं दानवे यांनी म्हटलं. 


अनेक राज्यांमध्ये सत्ता असून याचे पक्ष फोड..त्याचे पक्ष फोड..हे कर त्याला ते कर,याला त्याच्यावर लाव, यामुळे हे अहमदशहा यांचेच वैचारिक वारसदार असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली.


देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त झाल्याचा पलटवार


ज्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यांच्यापेक्षा दुसरे वैफल्य काय असू शकतं. उद्धव ठाकरेंना ते बोलले म्हणजे हेच वैफल्यग्रस्त झाले असल्याचा पलटवार अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय. 


दोन दिवसांपूर्वी अमरावतीदेवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केल्याचे दिसले. चिरंजीव उद्धव ठाकरे जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना दिसले त्यावेळी फार दुःख झाले अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती. यावेळी फडणवीस यांनी लोकसभेत कशामुळे पराभव झाला याचे गणितही सांगितले.


अब्दुल सत्तारांची पहिली आणि शेवटची ती बैठक


काल सिल्लोडमध्ये जिल्हा नियोजन समितीची जी बैठक झाली ती अब्दुल सत्तार यांची पहिली आणि शेवटची बैठक होती, असा टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला. यावेळी सिल्लोड मधून शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढवणार आहे मात्र मी लढवणार आहे की नाही हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील असेही ते म्हणालेत.