Chhagan Bhujbal नाशिक :  राज्यातील हेवीवेट नेते आमदार छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने समता परिषद व भुजबळ समर्थक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मंत्रिमंडळात संधी न दिल्यामुळे प्रचंड नाराज झालेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आता राजकारणातील आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच आज समता परिषदेच्या मेळाव्यातून छगन भुजबळांनी शेरोशाहीरी करत चौफेर फटकेबाजी केली आहे. आम्ही सभागृहात नाही पण, रस्ता तो मेरा है, आम्ही रस्त्यावर लढाई लढू असे म्हणत भुजबळांनी या सभेतून एकप्रकारे एल्गार करत इशारा दिला आहे. दरम्यान आता छगन भुजबळ आज नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  


नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?


मी सर्वाचे आभार मानतो की कमी वेळात तुम्ही सर्व आलात. माजी आमदार आणि भविष्यातील आमचे आमदार आलेत. लोकांची मन खिन्न आहेत काल पासून मी हे बघतोय. कोणीतरी गेल्या सारखी अवस्था आहे. लोकांना धक्का बसला आहे, कोणी त्यातुन बाहेर येत नाही. ही  गोष्ट येवला, लासलगाव पूर्ती नाही तर संपूर्ण राज्यात आहे.  संपूर्ण देशातून फोन येत आहेत. सर्वाची मागणी आहे, तुम्ही आमच्या शहरात जिल्ह्यात, राज्यात या, लोक पेटून उठत आहेत. मात्र आपण पेटवा पेटवी करायची नाही. तुम्ही निषेध करा, पण जोडे मारो, शिव्या नको. रोज सकाळी 8 वाजता काय चालू आहे, त्याची सगळी माहिती मुख्यमंत्रीपासून सर्वांना होत आहे. इथे सुद्धा मराठा नेते आहेत, निवडणुकीचे सारथ्य देखील मराठा समाजाच्या नेत्यांनी केले. आजही त्यांचे फोन येतात. फुलेंनी शाळा सुरू केली तेव्हाची भिडे यांनी वाडा दिला ते ब्राह्मण होते. काही लोक छोट्या मनोवृत्तीचे होते. पण सपोर्ट करण्यांत मुस्लिम तसेच ब्राह्मण समाजाचे लोक ही होते. सर्व आपले दुष्मन नाही,आपल्याला संपवायला  निघाले त्यांना आमचा विरोध आहे. 


मैं मौसम नहीं जो पल में बदल जाए.. 


आता पुन्हा मला सांगतात राज्यसभेत जा. मात्र, ज्यांनी माझ्यासाठी जिवाचं रान केले ते डोके फोडून घेतील. मग आधीच उभे करायला नको होते ना, मी माझ्या लोकांना आता सोडू शकत नाही. प्रफुल्ल पटेल यांनी मध्यस्थी केली, अजित पवार बोलले बसून चर्चा करू, पण अशी बैठक झालीच नाही. प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे यांनी भुजबळ यांना घ्या असे सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही शेवट पर्यंत प्रयत्न केल्याचे सांगितले. दुसऱ्या पक्षातील कोणी सांगितले नाही, पवार साहेबांकडचे फोन आले, बावनकुळे यांचे फोन त्यांना आले. मात्र काहीही झाले नाही. मात्र आता समाजाची ढाल बनून कोण उभा राहील, हा प्रश आहे. आता सर्व दिल्यानंतर असे का प्रश्न उभा होत आहे? या मागे तुमचा हेतू काय? अवहेलना करण्याचे शल्य मनात आहे. उद्या, परवा मी मुंबईला जाणार आहे, आपले ओबीसी नेते फोन करत आहेत, ते  भेटायला येणार आहेत. त्याच्याशी चर्चा करून निर्णय घेणार, त्यावेळी तुमची साथ मला हवी आहे.मैं मौसम नहीं जो पल में बदल जाए, मैं ऊस पुराणे जमाने का सिक्का हु, उसे फेक न देना, तुम्हारे बुरे वक्त मे मैं चल जाऊ.. असे म्हणत छगन भुजबळ यांनी आपली रोष व्यक्त केला आहे.  



हे ही वाचा