Chhagan Bhujbal & Narendra Darade : नाशिकच्या येवला (Yeola) तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे. विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे (Narendra Darade) हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुक्तागिरी बंगल्यावर आज नरेंद्र दराडे यांचा पक्ष प्रवेश पार पडणार आहे. दराडे यांच्यासह त्यांचे समर्थक पदाधिकारी व कार्यकर्ते देखील शिंदे गटात सामील होणार आहेत. दराडे यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नरेंद्र दराडे यांना टोला लगावला आहे. तर नरेंद्र दराडे यांनी देखील भुजबळांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी दराडे बंधूंवर नाव न घेता निशाणा साधलाय. हे बंधू इकडून तिकडे उड्या मारायचे काम करतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला. मंत्री भुजबळ म्हणाले, एक बंधू सत्तेत असतो, दुसरा सत्तेच्या बाहेर असतो आणि मुलगा शिवसेना पक्षाचा पदाधिकारी म्हणून कार्य करतो. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्यांशीच ते संपर्कात असतात. मग ज्याच्या हातात सत्ता असते, त्याच्याकडे जाऊन थांबतात. दरम्यान, माजी आमदार नरेंद्र दराडे हे आज अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. त्यांच्यासोबत स्थानिक राजकारणात काही नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे. मात्र, भुजबळांच्या या प्रतिक्रियेमुळे दराडे कुटुंबाच्या राजकीय भूमिकेवर पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची चिन्हे आहेत.
पाच पक्ष बदललेल्या मंत्र्यांनी माझ्यावर बोलू नयेत : नरेंद्र दराडे
दरम्यान छगन भुजबळांनी दराडे बंधू इकडून तिकडे उड्या मारायचे काम करतात, असा आरोप करत त्यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, मंत्री भुजबळांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना नरेंद्र दराडे यांनी थेट पलटवार केला. मंत्री छगन भुजबळ यांनी पाच पक्ष बदलले आहेत, अशा नेत्यांनी माझ्यावर टीका करू नये, असे दराडे म्हणाले. दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये रंगलेल्या या शाब्दिक युद्धामुळे येवला तालुक्याचे राजकारण पुन्हा एकदा तापल्याचे दिसून येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या