Maharashtra Politics: वक्फ दुरुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill 2025) लोकसभेत मंजूर झालं आहे. काल (2 एप्रिल) रात्री उशीरा वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी मतदान घेण्यात आलं. यावेळी विधेयकाच्या समर्थनात 288 तर विरोधात 232 मतं पडलीत. त्यामुळे वक्फ विधेयकावरून मोदी सरकारला मोठं यश मिळालंय आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून वक्फ दुरूस्ती कायद्याच्या विरोधात मतदान करण्यात आलं. वक्फ विधेयकात पारदर्शीपणा नाही, सरकारचा हेतू योग्य नसल्याची टीका ठाकरे गटाने केली. ठाकरे गटाच्या या भूमिकेवर मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडत काँग्रेसचे विचार उद्धव ठाकरे यांनी मान्य केल्याचा आणखी एक पुरावा जनतेसमोर ठेवला आहे. एका विशिष्ट समाजाच्या मतांवर डोळा ठेवत हे विरोधी मतदान केले आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. आज ठाकरेंची शिवसेना सोडण्याच्या मानसिकतेत शिवसैनिक आहेत. अनेक लोक पक्ष सोडणार आहेत. मंगळवारी मी पक्ष प्रवेश घेतला आहे. ठाकरे गटाने केलेले मतदान हे देशाचा व महाराष्ट्राचा अपमान आहे, असा निशाणा चंद्रशेखर बावनकुळेंनी साधला. तसेच जनता त्यांना माफ करणार नाही, जे खासदार निवडून दिले, तिथे लोकांना वाटेल ही चूक झाली. जनता आता उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना निवडून देणार नाही, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

निलेश राणेंचा ठाकरे गटावर घणाघात

उबाठा हा पक्ष वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयक लोकसभेत पास झालं म्हणून दुःखात आहे. कायदेशीर बाबी या विधेयकात आले हे उबाठा ला पचत नाही. त्यामुळे उबाठाची बाप मेल्यासारखी परिस्थिती झालीय, असा हल्लाबोल शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी केला. तुम्ही एका समाजाचे, एका धर्माचं तुम्ही लागून चालन करा. पण हा देश कायद्याने, संविधानाने चालतो. प्रत्येकाला कायदा इकडे समान आहे. मुसलमानांना वेगळा कायदा या देशात नाही. त्यांच्या जमिनी म्हणजे काय? कायद्याचे अंतर्गत ज्या जमिनी तुमच्या तुम्ही घ्या, पण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर इकडे जमीन लुटायचा अधिकार कोणालाच नाही. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला किती जरी वाईट वाटलं असेल तरी वक्फ बोर्डाच्या जमिनी ह्या कायद्यानेच इकडे चालणार, हा देश कायद्याने चालणार आहे, अशी वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकावर बोलताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

संबंधित बातमी:

Waqf Amendment Bill 2025: वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर; ठाकरेंच्या शिवसेनेनं केलं विरोधात मतदान, रात्री काय घडलं?