Sanjay Raut on Waqf Amendment Bill 2025 : वक्फ बोर्डाच्या महाराष्ट्रातील आणि मुंबईमधील जमिनींचे व्यवहार आधीच झालेले आहेत. त्या जमिनीच्या खरेदी विक्रीला कायदेशीर स्वरूप आणण्यासाठी हे विधेयक आणण्यात आले आहे, असा सनसनाटी आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. वक्फ दुरुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill 2025) लोकसभेत मंजूर झालं आहे. काल रात्री उशीरा वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी मतदान घेण्यात आलं. यावेळी विधेयकाच्या समर्थनात 288 तर विरोधात 232 मतं पडलीत. आता यावरून संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलाय. 

संजय राऊत म्हणाले की, हा मुस्लिमांच्या जमिनींवर कब्जा करण्याचा डाव आहे. गरीब मुसलमानांना यातून खूप मोठा उद्धार होणार आहे, ही जी काही भाषा काल केली, हे पूर्णपणे ढोंग आहे. अडीच लाख कोटीच्या वरच्या प्रॉपर्टीचे किंमत मूल्य केले आहे, अशा प्रॉपर्टीवर आपला अधिकार राहावा यासाठी काल हा सगळा खेळ झाला. अल्पसंख्यांक, मुसलमानांचा उद्धार यातून कसा होणार? काल अमित शहा यांच्या पोटातून एक सत्य बाहेर पडलं. 2025 पर्यंतच्या मशिदी, मदरसे आणि दर्गा यांना आम्ही हात लावणार नाही. पण, रिक्त जमिनीची विक्री करू. नकळत त्यांच्या तोंडातून हे सत्य बाहेर पडलं की, मोकळ्या जमिनीचा आम्ही सौदा करू. या मोकळ्या जमिनीची किंमत दोन लाख कोटी आहे, असे त्यांनी म्हटले.

जमिनीतून त्यांना पैसा मिळवायचाय 

आता या मोकळ्या जमिनी कोण कोणाला विकणार आणि कशा पद्धतीने विकणार? या देशामध्ये विकणारे दोन आहेत आणि विकत घेणारे देखील दोनच आहेत. दुसऱ्या कोणाला या जमिनी जाणार आहेत का? हा सगळा खटाटोप काय आहे हे काल स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडातून बाहेर पडले आहे. या जमिनी आम्ही विकणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. काल त्यांचे ढोंग नकळत बाहेर पडले. या जमिनी त्यांना विकायच्या आहेत. या जमिनीतून त्यांना पैसा मिळवायचा आहे. या जमिनीचा त्यांना व्यापार आणि व्यवहार करायचा आहे. तो सुद्धा आपापसातल्या लोकांमध्येच करायचा आहे. दोन लाख कोटीच्या वरच्या या जमिनी आहेत आणि त्या जमिनीवर डोळा असल्यामुळे या लोकांनी हे काम केले आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. 

नवीन धार्मिक आयपीएल सुरू

संजय राऊत पुढे म्हणाले की,  हा भ्रष्टाचार आहे. आम्ही या भ्रष्टाचाराच्या विरोधात मतदान केले आहे. प्रत्येक विषयावर हिंदू-मुसलमान करायचे. एकेकाळी आपला हॉकी हा राष्ट्रीय खेळ होता. त्यानंतर आमचे जय भाई शहा हे क्रिकेटचे सूत्रधार  झाल्यावर क्रिकेट राष्ट्रीय खेळ झाला. मुसलमानाच्या विरोधात मुसलमान लढविला जातोय. हिंदू विरोधात हिंदू लढविला जातोय, असे एक नवीन धार्मिक आयपीएल यांनी सुरू केले आहे. कालचा बिलाचा मसुदा आणि कालचे भाषण ऐकले तर त्यामध्ये फक्त संपत्ती, संपत्ती आणि संपत्ती, त्याच्या पलीकडे वेगळे काहीही नाही. त्यांना स्वप्नात सुद्धा संपत्ती दिसते. खाता-पितांना उठताना त्यांना फक्त जमिनी दिसतात, असेही त्यांनी म्हटले.  

महाराष्ट्र आणि मुंबईतल्या वक्फ बोर्डाच्या जमिनींचे व्यवहार आधीच झालेत

वक्फ बोर्ड विधेयकाच्या पार्श्वभूमीवरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, त्यांना दिवसरात्र, पहाटे शिवसेनेची भीती वाटते.  त्यांनी केलेले शिवसेना फोडण्याचे पाप त्यांना अजून पचवता आलेले नाही. आम्ही त्यांचे ढोंग आणि पाप सदैव उघडे करत असतो. वक्फ बोर्डाच्या महाराष्ट्रातील आणि मुंबईमधील जमिनींचे व्यवहार आधीच झालेले आहेत. त्या जमिनीच्या खरेदी विक्रीला कायदेशीर स्वरूप आणण्यासाठी हे विधेयक आणण्यात आले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची भीती मी समजू शकतो. आम्ही त्यांना एक्स्पोज करणार आहोत आणि करत आहोत, त्यांची भीती आम्ही समजू शकतो, असा पलटवार त्यांनी केला.  

आणखी वाचा 

Waqf Amendment Bill 2025: वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर; ठाकरेंच्या शिवसेनेनं केलं विरोधात मतदान, रात्री काय घडलं?