Chandrashekhar Bawankule On Congress : काँग्रेसला मत देणे म्हणजे देशात अराजकता निर्माण करणे असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केले आहे. राहुल गांधींनी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला होता आणि आता कर्नाटक सरकारला (Karnataka Government) आदेश देऊन त्यांनीच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अभ्यासक्रमातला धडा उडवून टाकायला लावल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. काँग्रेसने कर्नाटकात धर्मांतर बंदी कायदा रद्द केला असून भविष्यात गोहत्या बंदीचा कायदा ही रद्द करतील. त्यामुळे काँग्रेसला (Congress) दिलेलं एक मत म्हणजे किती मोठी चूक आहे, याचं कर्नाटक उदाहरण असल्याचे बावनकुळे म्हणाले. 


कर्नाटकच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी आजच भूमिका स्पष्ट करावी


किमान आता तरी उद्धव ठाकरे यांनी लंडनमधून भूमिका स्पष्ट करावी. कर्नाटकमध्ये झालेला प्रकार त्यांना मान्य आहे का? उद्धव ठाकरे भविष्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत का? हे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगावे अशी मागणीही बावनकुळे यांनी केली. उद्धव ठाकरेंनी कर्नाटकाच्या मुद्द्यावर उशीर न लावता आजच त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे असेही बावनकुळे म्हणाले.


उद्धव ठाकरे यांच्यासाठी आता आमचे दार बंद


दरम्यान उद्धव ठाकरे यांच्याशी पुन्हा मैत्रीसंदर्भात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री मौर्य यांनी जे वक्तव्य केले आहे, ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी आता आमचे दार बंद आहे. आम्ही त्यांच्याशी कुठलीही चर्चा करणार नाही. आमची त्यांच्याशी कुठलीही चर्चा सुरु नाही असे स्पष्टीकरण ही बावनकुळे यांनी दिले.


देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील क्रमांक एकचे नेते


देवेंद्र फडणवीस पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. कधी कधी जनतेच्या भल्यासाठी राज्याच्या हितासाठी काही भूमिका स्वीकाराव्या लागतात अशी सूचक प्रतिक्रिया ही त्यांनी दिली. 2019 मध्ये आम्ही बहुमताने आलो होतो. राज्याच्या जनतेने फडणवीस यांनाच मान्य केले होते. मात्र आमच्यासोबत दगाबाजी झाली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील क्रमांक एकचे नेते आहे. हे 2014 आणि 2019 मध्ये सिद्ध झाले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या खच्चीकरण करण्यासाठी कोणीही काम करत नाही. त्यामागे आमच्या नेत्यांचा हात आहे हे बोलणं चूक आहे असे प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली. तसंच आता आम्ही जाहिरातीच्या प्रकरणापासून पुढे गेलो असून जाहिरातीमुळे दोन्ही पक्षात तणाव नव्हता असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.