पुणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांच्याकडे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.  भाजपचे विद्यमान अध्यक्ष जे पी नड्डा (J. P. Nadda)  हे केंद्रात मंत्री झाल्यावर आता पुढील अध्यक्ष कोण असतील या  चर्चा सध्या सुरू झाल्या आहेय  त्यात सर्वात आघाडीवर फडणवीस यांचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे.   विशेष म्हणजे  फडणवीस जर राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर आम्हा सर्वांना आनंद आहे.  त्यांच्यात राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे  गुण आहेत, अशी प्रतिक्रिया  भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी दिली आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. 


चंद्रकांत पाटील म्हणले,  बऱ्याच बातम्या मला माध्यमांकडूनच कळतात. देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होणार असतील तर आम्हा सर्वांना आनंद आहे त्यांच्यात ते सर्व  गुण आहेत.


उद्धवजी अलिकडच्या काळात जास्त त्रागा करत आहे : चंद्रकांत पाटील 


उद्धव ठाकरेंवर देखील चंद्रकांत पाटलांनी निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले,  उद्धवजी अलिकडच्या काळात जास्त त्रागा व्यक्त करतात. माणसांनी तेच बोलावं पण व्यवस्थित बोलावं. उद्धव ठाकरे जे बोलले त्याची प्रतिक्रिया सामान्य माणसातून येणार आहे. एकनाथ शिंदेंनी तुम्हाला दगा दिला की तुम्ही अन्याय करत होता. पालघरमध्ये साधूंची हत्या झाली तो खरा टर्निंग पॉईंट ठरला.


सुजय विखे विधानसभा लढवणार का? चंद्रकांत पाटील म्हणाले...


लोकसभेत पराभव झाल्यानंतर सुजय विखे विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहे. संगमनेर किंवा राहुरीमधून लढण्याची तयारी करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या विषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले,  सुजय विखे विधानसभा लढवतील की नाही याचा पक्ष निर्णय घेईल.  


देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार?


देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्य सरकारमधील सर्व जबाबदाऱ्यांचा त्याग करुन भाजप पक्षसंघटनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला महाराष्ट्रातील भाजप पक्षसंघटनेची मोट पुन्हा नव्याने बांधायची असल्याचे फडणवीसांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले होते. त्यासाठी मला राज्य सरकारमधील सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा, अशी विनंती फडणवीसांनी केली होती. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांना आता थेट दिल्लीतच बोलावून घेण्याची योजना आखल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर भाजपच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाची धुरा दिली जाऊ शकते. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पाठिंबा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला कधी बोलावले जाणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 


हे ही वाचा :


 देवेंद्र फडणवीसच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी मोस्ट सुटेबल कँडिडेट का?