Tuljapur Temple: उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी भाजपचे खासदार संभाजीराजे यांना कुलस्वामामिनी तुळजाभवानी मंदिरात असताना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार सोमवारी घडला आहे. या प्रकारमुळे तुळजापूरात खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीराजे यांना तुळजापूर मंदिर संस्थानकडून गाभाऱ्यात दर्शन देण्यासाठी अडवल्याने तुळजापूरकर संतप्त आहेत. अशातच आता या प्रकाराविरोधात उद्या (गुरुवारी) तुळजापूरात बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाकडून ही बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाज आणि तुळजापूरकरांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी जिल्हाधिकारी, मंदिर तहसीलदार आणि व्यवस्थापक यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. तुळजाभवानी मंदिर आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या घराण्याचं विशेष नातं राहिलं आहे. मात्र पुरातत्व विभागाच्या एका निर्णयामुळे त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून थांबण्यात आल्याचं बोललं जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, देऊळ कवायतमध्ये एक नियम आहे, हा नियम याच्या आधीपासून होता. मात्र विद्यमान जिल्ह्याधिकाऱ्यांनी जे तुळजापूर मंदिराचे प्रशासकीय प्रमुख देखील आहेत, त्यांनी मूर्तीची झीज होत असल्याने याच्या संवर्धनासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यास बंदी घातली आहे. त्यांनी याआधी देखील मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून लोकप्रतिनिधींना रोखलं होत. तेव्हाही काही वाद झाले होते. मात्र तुळजाभवानी आणि कोल्हापूर यांचे नाते काही वेगळे आहे. कोल्हापूर संस्थांकडून मंदिरात काही पारंपरिक विधी केल्या जातात. हे खूप आधीपासून चालत आहे. अशातच ही घटना घडली तेव्हा हा वाद सामंजस्याने मिटेल, असे बोलले जात होते. ही घटना घडल्यानंतर मंदिर संस्थांच्या वतीने दिलगिरीही व्यक्त करण्यात आली. मात्र ही भूमिका पुरेशी नाही, असं आज सकल मराठा समाज आणि तुळजापूरकरांच्या बैठकीत ठरल्यामुळे, उद्या तुळजापूरात बंदची हाक देण्यात आली आहे.     


दरम्यान, संभाजीराजे मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दौऱ्यावेळी कुलस्वामामिनी तुळजाभवानी मंदिरात गेले असता गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता ही छत्रपती घराण्याची कुलस्वामिनी वरदायिनी असल्याने छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य नेहमी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येतात. तुळजाभवानी मंदिरात आल्यानंतर ते नेहमी थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेतात. ही शेकडो वर्षांची परंपरा आहे.मात्र सोमवारी 9 मे रोजी संध्याकाळी 9 वाजेच्या सुमारास दरम्यान खासदार संभाजीराजे छत्रपती यांना मातेच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आलं.