BMC Election : मुंबई महापालिका (BMC) त्यासोबतच इतर येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गटासोबत (Thackeray Group) वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) युतीत लढणार असल्याचं प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. इतकंच काय तर शिवसेना ठाकरे गटासोबत चर्चा होण्याआधी बीएमसीच्या 83 जागा लढण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीची होती. मात्र आता शिवसेना ठाकरे गट ज्या जागा सोडेल त्या जागा वंचित बहुजन आघाडी लढेल, असा निर्णय झाल्याचा प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.


काँग्रेस, राष्ट्रवादी ठाकरे शिवशक्ती आणि भीमशक्तीसोबत निवडणूक लढवणार?


त्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती सोबत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढवणार का? त्यावर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सोबत एकत्र यायला तयार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. मात्र वंचितला सोबत घ्यायला शिवसेना ठाकरे गट जरी तयार झाली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा खुलेपणाने आम्हाला विरोध आहे तर काँग्रेसचा छुपा विरोध आम्हाला असल्याचं सूत्रांकडून कळल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यामुळे आता निर्णय शिवसेना ठाकरे गटाला घ्यायचा आहे.


शिवसेनेच्या ऐतिहासिक बंडानंतर समीकरणे बदलली


बीएमसी निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गट युतीत लढणार असेल तर आपली ताकद वाढवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाला मुंबई महापालिका निवडणुकीत वंचितसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंबाची सुद्धा गरज असेल. मागील बीएमसी निवडणुकीत महाविकास आघाडी अस्तित्वात नसताना शिवसेनेला 227 पैकी 84 जागेवर तर काँग्रेसला 31 जागेवर आणि राष्ट्रवादीला नऊ जागेवर विजय मिळवता आला. मात्र, शिवसेनेच्या ऐतिहासिक बंडानंतर समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन मोठे पक्ष वंचितला सोबत घेण्यावर तयार होतील का हे सुद्धा आम्ही या दोन पक्षाच्या नेत्यांना विचारलं. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही मित्र पक्ष एकत्र येऊन जागा वाटपाचा निर्णय घेतील. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याला आमचा विरोध नाही, असं अजित पवार म्हणाले.


शिंदे गट आणि ठाकरे गटाचा ताकद वाढवण्याचा प्रयत्न


एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती होत असताना दुसरीकडे पीपल्स रिपब्लिकन पक्ष यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट आगामी निवडणुकांसाठी सर्वच बाजूंनी आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे


आगामी मुंबई महापालिका निवडणुका विचारात घेता भाजप आणि शिंदे गटाचं मोठं आव्हान शिवसेना ठाकरे गटासमोर असणार आहे. बीएमसीवर असलेली 25 वर्षांपासूनची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत इतर मित्रपक्षांना सुद्धा सोबत घेऊन एक नवी रणनीती आखावी लागणार आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला कितपत यश येतं? आणि मविआचे काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीसारखे मित्रपक्ष कशी साथ देतात? हे येणाऱ्या निवडणुकांमध्येच कळेल.


VIDEO : Prakash Ambedkar on Shiv Sena Vanchit Alliance : महापालिका निवडणुका शिवसेनेसोबत लढण्याचा निर्णय झालाय