BMC Election 2026: आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना ठाकरे गटाचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी एक सनसनाटी दावा केला आहे. भाजपने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (BMC Election 2026) जिंकली तर मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांना महापौरपदी बसवण्यात येईल, असा दावा चित्रे यांनी केला आहे. अखिल चित्रे यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, भाजपाने मुंबईत आजपर्यंत शेट्टी, बारोट, ठाकूर, पटेल असले अमराठी उपमहापौर दिले... त्यामुळे आज जेव्हा पत्रकार भाजपा नेत्यांना विचारतात कि, "मुंबईचा महापौर मराठी असेल का?" त्यावर फडणवीस म्हणतात, "महापौर महायुतीचाच होणार..." शेलार म्हणतात, "महापौर हिंदू होणार..." पण कुणीही छातीठोकपणे सांगत नाही कि, महापौर मराठीच होणार ! ह्याचाच अर्थ त्यांचा मुंबई 'महापौर'पदाचा अमराठी उमेदवार ठरलाय…मोहित कंबोज ठरलाय ! मराठी माणसा, आपल्या मुंबईवर अशा उपऱ्याला राज्य करू द्यायचं का? धनाढ्य आहे म्हणून महायुती हुजरी असेल पण स्वाभिमानी मराठी माणसाने अशांना हिसका दाखवावा, असे आवाहन अखिल चित्रे यांनी आपल्या पोस्टमधून केले आहे. अखिल चित्रे यांच्या या दाव्यानंतर आता भाजपच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया देण्यात येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Mumbai Mahanagarpalika Nivadnuk 2026)

Continues below advertisement

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महायुतीकडून एकत्र लढवली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुख्यत्वेकरुन भाजप आणि शिंदे गटात जागावाटप होईल. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत फारशी ताकद नाही. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप या दोन पक्षांचा जागावाटपात वरचष्मा असेल. परंतु, मुंबईची निवडणूक जिंकल्यास महापौर कोणाचा होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजप आणि शिवसेना दोघांकडून महापौर आमचाच असणार, असे म्हटले जाते. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी, 'मुंबईत महापौर हा महायुतीचा असेल', असे सस्पेन्स कायम ठेवणारे उत्तर दिले होते. मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या. तर एकत्रित शिवसेनेने 84 जागांवर विजय मिळवला होता. परंतु, त्यावेळी भाजपने उद्धव ठाकरे यांचे मन राखण्यासाठी महापौरपद मिळवण्यासाठी ताकद लावली नव्हती. मात्र, यंदा भाजपसाठी मुंबईत कधी नव्हे इतकी अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे आता भाजपने कोणत्याही परिस्थितीत मुंबईत आपला महापौर बसवण्याचा चंग बांधला आहे. परंतु, महापौरपदाचा उमेदवार कोण असेल, हे मात्र भाजपने गुलदस्त्यात ठेवले आहे.

आणखी वाचा

मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला