मुंबई : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ओळखपत्रे जप्त करुन त्यांना जबरदस्तीने बसवून भाजपने (BJP) लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी (Lok Sabha Election 2024) सभा घेतल्याचा आरोप शिवसेना (Shiv Sena) उबाठा (Uddhav Thackeray Group) युवासेनेकडून (Yuva Sena) करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं आयडी जप्त करत प्रचार सभेसाठी (Election Campaign) हजर राहण्याची सक्ती केल्याचा प्रकार मुंबईतील महाविद्यालयात समोर आला आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. भाजपचे उमेदवार पीयुष गोयल (Piyush Goyal) यांचा मुलगा ध्रुव गोयल (Dhruv Goyal) यांनी ही सभा घेतल्याचं बोललं जात आहे.  विद्यार्थ्यांची ओळखपत्रे जप्त करुन परीक्षेच्या आदल्या दिवशी त्यांना सभेसाठी हजेर राहण्याची सक्ती करण्यात आल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. मुंबईच्या कांदिवलीतील ठाकूर कॉलेजमधील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रचाराच्या सभेसाठी विद्यार्थ्यांना हजेरीची सक्ती करणाऱ्या या पक्षाच्या हाती देशाचे भवितव्य कसे सुरक्षित असेल, असा सवाल ठाकरे गट शिवसेनेच्या युवासेनेने उपस्थित केला आहे.


भाजपच्या प्रचारासाठी विद्यार्थ्यांचं आयडी जप्त


शिवसेना उबाठा युवासेनेने यावर टीका करत म्हटलं की, भारतीय जनता पक्षाने मुंबईतील महाविद्यालयीन विध्यार्थ्यांना चोर मार्गाने त्यांच्या लोकसभा उमेदवारांच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी जबरदस्तीने महाविद्यालयाच्या सभागृहात बसवून उमेदवाराचे सुपुत्र प्रचार करीत असल्याचे कांदिवली येथील ठाकूर महाविद्यालयात निदर्शनात आले आहे. यापूर्वी देखील मतदार नोंदणीच्या नावाखाली कीर्ती महाविद्यालय येथे असाच प्रकार झाला होता, त्याचा जाब आम्ही युवासेना माजी सिनेट सदस्य म्हणून महाविद्यालयीन प्रशासन आणि मुंबई विद्यापीठ माननीय कुलगुरु यांच्याकडे तक्रार करुन विचारला होता. पण आज पुन्हा त्या गोष्टींची पुनरावृत्ती झाली आहे. विशेषतः निवडणुकीची आचारसंहिता सुरु असताना होत आहे, याबाबत आम्ही पुन्हा सदर महाविद्यालयं आणि विद्यापीठ प्रशासनास जाब विचारणार आहोत तसेच याबाबीचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत.


सभेला हजर राहण्याची सक्ती, कांदिवलीतील प्रकार


शिवसेना उद्धव ठाकरे गटाने व्हिडीओ एक्स मीडिया म्हणजे ट्विटरवर पोस्ट करत लिहीलं आहे की, ठाकूर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असताना त्यांचे महाविद्यालयाचे ओळखपत्र जप्त करण्यात आले आणि त्यांना भाजपने आयोजित केलेल्या सेमिनारमध्ये भाग घेण्यास भाग पाडले. सेमिनारला उपस्थित राहिल्यानंतरच त्यांची कॉलेजची ओळखपत्रे परत देण्यात आली. ही अशी लोकशाही आहे का ज्यात आपण जगत आहोत? जिथे शिक्षणाला अत्यंत महत्त्व असते तिथे राजकारणाची सक्ती असते. जिथे हुकूमशाहीची विचारसरणी विद्यार्थ्यांवर लादली जाते. केवळ आपल्या देशातील लोकशाहीच नाही तर आपली शिक्षण व्यवस्थाही गंभीर संकटात आहे, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.


पाहा व्हायरल व्हिडीओ : 






 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात पाच ठिकाणी मतदान, अर्ज भरण्यासाठी होणार इच्छुकांची धावाधाव, कारण काय?