Pravin Datke on Ladki Bahin मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या लँडस्लाईड यशानंतर महायुती सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला. राज्याच्या मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे विराजमान झाले आहे. दरम्यान महयुतीला कधी नव्हे ते अभूतपूर्व यश या निवडणुकीत मिळालं. या यशामागे काही महिन्यांपुर्वी महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेचे श्रेय असल्याचं बोललं जात आहे.


दरम्यान निवडणुकीच्या प्रचारकाळात महायुतीने लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ 2100 रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे नवं सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेचे (Ladki bahin yojana) पुढे काय? अशी जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं विधानसभेत  35 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. यामध्ये 1400 कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात केली आहे.


लाडकी बहीण योजनेत तृतीय पंथीयांचा समावेश करावा- प्रवीण दटके


अशातच, नागपूरच्या मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार प्रवीण दटके (Pravin Datke)  यांनी या संदर्भात एक वेगळी मागणी केली आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवून 2100 करावी. सोबतच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत तृतीय पंथीयांचा समावेश करावा, अशी महत्त्वाची मागणी भाजप प्रवीण दटके यांनी आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषनासंदर्भातील चर्चेत केली आहे.


राज्य सरकारने महिलांचा सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या, आता लाडकी बहीण योजनेमध्ये तृतीयपंथीयांचा समावेश करावा, अशी मागणी आमदार प्रवीण दटके यांनी केली. हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावर बोलतांना आमदार प्रवीण दटके म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने आतापर्यंत अनेक योजना आणल्या. त्यामध्ये लाडकी बहीण योजना आणली. महिलांना बसमध्ये प्रवासात सवलत दिली. मुलींचे उच्च शिक्षण मोफत केलं. आता लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथीयांचा समावेश करावा, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करत असल्याचे ते म्हणले. 


लाडक्या बहिणींना  2100 रुपये कधी मिळणार? 


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना दर महा 1500 रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेतून जवळपास अडीच कोटी महिलांच्या खात्यात रक्कम पाठवली जाते. राज्य सरकारनं जुलै ते नोव्हेंबर महिन्यांपर्यंतचे पाच हप्त्यांचे  1500 रुपयांप्रमाणं 7500 रुपये दिले गेले आहेत. आता महिलांना डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महायुतीनं महिलांना दरमहा  2100 रुपये देऊ असं म्हटलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2100 रुपयांच्या बाबत भाष्य केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात याबाबत विचार करु असं म्हटलं होतं, त्यामुळं लाडक्या बहिणींना 2100 रुपये दरमहा मिळण्यासाठी आणखी काही महिन्यांची वाट पाहावी लागेल.



हे ही वाचा