नागपूर : भाजपकडून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत नागपूर सह संपूर्ण राज्यात 20 ते 25 टक्के सीटिंग नगरसेवकांना उमेदवारी नाकारली जाणार असल्याची माहिती आहे. प्रभागातील आणि पक्षीय कामात सक्रियता आणि निष्क्रियता असे निकष लावून हे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती आहे. तसेच ज्या महिला नगरसेविकांनी गेल्या पाच वर्षात स्वतः सक्रीय राहण्याऐवजी प्रभागातील काम आपल्या पती किंवा नातेवाईकांवर सोपवून दिले होते अशा महिला नगरसेविकांनाही डच्चू दिले जाणार असल्याची माहिती आहे.
नागपूर सारख्या ठिकाणी महापालिकेत गेले अनेक वर्ष सत्तेत असताना स्वाभाविकरित्या येणाऱ्या अँटी इन्क्यूमबन्सीचा सामना करण्यासाठी भाजपने हे वीस ते पंचवीस टक्के नवीन चेहरे उतरविण्याचे ठरविले आहे.
यंदा उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपने विविध प्रभागांमध्ये तीन सर्व्हे करून घेतले आहेत. त्यामध्ये कोण प्रबळ उमेदवार राहू शकतो, विरोधी पक्षाचा उमेदवार कोण असू शकतो, पक्षात नवीन आलेल्या पैकी कोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते अशा मुद्द्यांवरही सर्व्हेमध्ये पक्षाने माहिती गोळा केली आहे.
महानगरपालिकांमध्ये पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव असल्याने यंदा महिला उमेदवार देताना पक्षाने नेत्यांच्या किंवा राजकारणात सक्रीय असलेल्या कुटुंबातील महिलांना सरसकट संधी देण्याऐवजी संबंधित महिला उमेदवाराची लोकप्रियता आणि पक्षासाठी केलेले काम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रभागातील सक्रियता असे निकष लावण्याचे ठरविल्याची माहिती आहे.
भाजप शिवसेना युती म्हणून लढणार
भाजप आणि शिवसेना युती करत महापालिका निवडणुकांना सामोरं जाणार आहे. मुंबई आणि पुण्यात शिवसेना आणि भाजपच्या जागा वाटपासंदर्भात बैठका पार पडल्या. मुंबई भाजपचे प्रमुख अमित साटम यांनी भाजप आणि शिवसेनेत 150 जागांवर एकमत झाल्याची माहिती दिली. या बैठकीला शिवसेनेकडून उदय सामंत उपस्थित होते. तर, पुण्यात देखील भाजप आणि शिवसेना यांची संयुक्त बैठक पार पडली. पुण्यात मुरलीधर मोहोळ- विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाल्यानंतर नगरपालिका निवडणुकीत देखील पक्षाला मोठं यश मिळेल, असं पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. आता येत्या रविवारी जाहीर होणाऱ्या नगरपालिका निकालांमध्ये भाजपला कशा प्रकारे यश मिळतंय ते पाहावं लागेल.
राज्यातील महापालिका निवडणूक कार्यक्रम
- नामनिर्देशन पत्र स्वीकारणे - 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
- अर्जाची छाननी - 31 डिसेंबर
- उमेदवारी माघारीची मुदत - 2 जानेवारी
- चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी - 3 जानेवारी
- मतदान - 15 जानेवारी
- निकाल - 16 जानेवारी