मुंबई : भाजपाच्या नेत्या तथा माजी खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांनी त्यांचे वडील प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांच्या हत्येबाबत मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. माझ्या वडिलांच्या हत्येमागे काहीतरी मोठं षडयंत्र आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत त्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार आहेत. पूनम महाजन यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.


हत्येमागील बुद्धी फक्त एका भांडणाची नाही


पूनम महाजन यांनी 'मुंबई तक' या माध्यमाला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांचे वडील प्रमोद महाजन यांच्या हत्येवर भाष्य केलं. यावेळी बोलताना "मी गेल्या काही वर्षांपासून याबाबत बोलत आहे. ज्या बंदुकीतून गोळी झाडण्यात आली, त्या बंदुकीचे आणि गोळीचेही पैसे प्रमोद महाजन यांचे होते. कोणी कोणावर रागाने असा अन्याय करतं तेव्हा तुम्ही एखाद्या व्यवस्थेचं, यंत्रणेचं उल्लंघन करत असता. हे मी पहिल्यापासूनच बोलत आहे. माझ्या वडिलांवर गोळ्या झाडणारे हात, गोळी त्या माणासाचे होते. त्या व्यक्तीचा त्यामागे काहीतरी राग असेल. पण त्या हत्येमागचं कारण आणि ती बुद्धी फक्त एका कोणत्यातरी फालतू भांडणाची नाहीये," असा दावा त्यांनी केला.


त्या हत्येमागे काहीतरी मोठं कारण आहे


तसेच, माझ्या वडिलांच्या हत्येमागे काहीतरी कारण आहे. मी त्या कारणाला कधी राजकीय म्हटले नाही. पण त्या हत्येमागे काहीतरी मोठं कारण आहे. त्यामागे षडयंत्र आहे, असं दिसतं, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.


...तेव्हा मला गांभीर्याने घेतलं नाही


"मी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाहा यांना याबाबत पत्र लिहिणार आहे. या प्रकरणाचा पुन्हा तपास व्हावा अशी मी विनंती करणार आहे. कारण सध्या मी त्या परिस्थितीत आहे. मी 2007-2008 साली मी याबाबत जेव्हा बोलत होते, तेव्हा सत्ता आपली नव्हती. किंवा कदाचित मला तेवढं गांभीर्याने घेण्यात आलं नव्हतं. पण मी आज या परिस्थितीत आहे, मी त्या प्रकरणावर आज बोलू शकते," असंही पूनम महाजन यांनी सांगितलं.


माझ्या मागणीचा निवडणुकीशी संबंध नाही


"सध्या निवडणूक चालू आहे. त्यामुळे या प्रकरणाला सनसनाटी मिळायला नको. माझ्या या मागणीचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. अगोदर मी गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे," अशी माहितीही पूनम महाजन यांनी दिली.


हेही वाचा :


दत्ता सामंत ते प्रमोद महाजन, बाबा सिद्दिकींच्या आधी राज्यातील अशा दोन हत्या ज्याने अख्खा देश ढवळून निघाला!


Pramod Mahajan: प्रमोद महाजन यांच्या हत्येचा मास्टरमाईंड कोण?


तिकीट मिळालं नाही तेव्हा उद्धव ठाकरे, रश्मी वहिनींचा फोन आला, पूनम महाजन यांनी सांगितलं 'तेव्हा' नेमकं काय घडलं?