मुंबई: अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर आज राज्यभरात गणपती बाप्पााला निरोप दिला जात आहे. राज्यभरात सार्वजनिक मंडळाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या आहेत. यासोबतच 10 दिवसांच्या घरगुती गणपतींचेही आज विसर्जन (Ganesh Visarjan 2024) होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावरील गणपतीचेही मंगळवारी विसर्जन करण्यात आले. सागर बंगल्यावर उभारण्यात आलेल्या कृत्रिम हौदात गणपतीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
देवेंद्र फडणवीस यांनी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर म्हटले की, गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. त्याने सर्वांची विघ्न दूर करावीत. तसेच गणपती हा बुद्धीची देवता आहे. त्यामुळे गणपती बाप्पााने आम्हालाही सुबुद्धी द्यावी आणि ज्यांना सर्वात जास्त बुद्धीची गरज आहे त्यांनाही द्यावी, अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी असलेल्या गणपतीच्या दर्शनाला अनेक राजकीय नेते आले होते. भाजपचे केंद्रीय अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे फडणवीसांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला येऊन गेले. याशिवाय, मुंबईतील काँग्रेसचे बडे नेते अमीन पटेल यांनी गणपती दर्शनाच्यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेटही चर्चेचा विषय ठरली होती. याशिवाय, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठकही फडणवीसांच्या बंगल्यावर पार पडली होती.
राज्यात दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक
राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर विधानसभा निवडणूक होण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. महायुतीच्या नेत्यांमध्ये सध्या जागावाटपाची बोलणी सुरु आहे. पितृपक्ष संपल्यानंतर महायुतीकडून उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. दिवाळी संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात मतदान आणि मतमोजणी पार पडेल. यंदा महाराष्ट्रात दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक होण्याचीही शक्यता आहे.
आणखी वाचा
गणपती विसर्जनाच्या दिवशीच 'जिओ'वर गंडांतर! सकाळपासून नेटवर्क गायब, युजर्स हैराण