मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री मुंबईत महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृहावर रात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत अमित शाह यांनी महायुतीच्या (Mahayuti Meeting) नेत्यांनी महत्त्वाच्या सूचना आणि सल्ले दिले. लोकसभा निवडणुकीच्या काळातील चुका टाळा. विधानसभेच्या (Vidhan Sabha Election 2024) उमेदवारांची निवड करताना विनिंग मेरिट हाच निकष डोळ्यांमसोर ठेवा, असे अमित शाह यांनी महायुतीच्या नेत्यांना सांगितले. 


याशिवाय, विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीमधील बेबनाव चव्हाट्यावर येऊ देऊ नका, अशी ताकीद अमित शाह यांनी नेत्यांना दिली. या बैठकीत अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणत्या भागात किती आणि कधी सभा घ्यायच्या, याबाबतच्या नियोजनासाठी महायुतीच्या नेत्यांशी चर्चा केल्याचे समजते. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी अमित शाह यांनी भाजपच्या काही नेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवली आहे. अमित शाह हे सोमवारी लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरील गणपतीचे दर्शन घेणार आहेत. याशिवाय, ते भाजप नेते आशिष शेलार यांच्या घरीही गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहेत.


राज्यातील विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महायुतीच्या अनेक नेत्यांनी तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे नोव्हेंबर महिना संपण्यापूर्वी राज्यात नवे सरकार अस्तित्त्वात येईल, असा अंदाज आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अवघ्या 17 जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे आता विधासभा निवडणुकीत ही कसर भरुन काढण्यासाठी आणि आपले सरकार कायम ठेवण्यासाठी सध्या महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार प्रयत्न होताना दिसत आहेत. 


अमित शाहांनी महायुतीच्या बैठकीत दिलेले सात महत्त्वाचे सल्ले कोणते?


1. महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आणू नका, जाहीर वाद टाळा.


2. लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळा.


3.  जिंकून येण्याची क्षमता असलेले योग्य उमेदवार निवडा.


4. विरोधकांच्या फेक नरेटिव्हला उत्तर द्या.


5. महायुतीच्या नेत्यांनी संयम ठेवावा, एकजूट दिसेल, याची काळजी घ्या.


6. राज्य सरकारने घेतलेले निर्णय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.


7. भाजपच्या ज्या आमदारांची कामगिरी समाधानकारक नाही त्या जागांबाबत योग्य निर्णय घ्या.


आणखी वाचा


बॉम्बे नको मुंबई नाव हवं, अशी मागणी करणारा मी होतो; किमान तुमच्या घरात तरी मातृभाषेत बोला : अमित शाह