heena gavit vs govil k padvi : नंदुरबार लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून माजी मंत्री के सी पाडवी याचे पुत्र गोवाल पाडवी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नंदुरबारमध्ये आता वकील विरुद्ध डॉक्टर असा सामना होणार आहे. होय.. गोवाल पाडवी हे पेशानं वकील आहेत. तर भाजपच्या उमेदवार हिना गावित या डॉक्टर आहेत. त्यामुळे नंदुरबारमधील या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. गोवाल पाडवी वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार का? अशी चर्चाही या मतदारसंघात सुरु आहे. कारण, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केसी पाडवी यांना हिना गावित यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ आदिवासी बहुल असून या मतदार संघात धनगर आरक्षण त्याच सोबत तसेच विकास कामांमधील भेदभाव यासह रोजगार, आरोग्य आणि इतर मोठ्या विषयांवर निवडणूक रंगणार हे मात्र निश्चित. नंदुरबार लोकसभा निवडणुकीत एक डॉक्टर तर वकील मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे राज्यातील या हायव्होल्टेज लढतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
हिना गावित यांचा अल्प परिचय -
नंदुरबार जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा पारंपारिक गड राहिला आहे. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पडण्याच काम ज्या डॉ विजयकुमार गावित यांनी केलं. त्याच्या जेष्ठ कन्या आहेत डॉ हिना गावित. त्या दोन वेळा या मतदारसंघाच्या खासदार राहिल्या आहेत. आता त्यांना भाजपने तिसऱ्यांदा संधी दिली आहे. काँग्रेसच्या माणिकराव गावितांना धोबी पछाड देत 2014 साली हिना गावीत विजायी झाल्या होत्या. गेल्या निवडणुकीत त्यांनी केसी पाडवी यांचा पराभव केला होता. डॉ हिना गावित यांचा आतापर्यंतचा प्रवास हा लोकल ते गोबल असा राहिला आहे. 1981 साली जन्मलेल्या हिना यांच प्राथमिक शिक्षण नटावद या गावी झालं. तर बारावी पर्यंत शिक्षण मिशन स्कूल नंदुरबार येथे झालं. हिना यांनी MBBS पुण्यातून तर MD चं शिक्षण मुंबईच्या जे जे हॉस्पिटल मधून घेतलं आहे. आता त्यांनी खासदार असतांना एलएलबी केले आहे. वाचन , प्रवास आणि खेळांची विशेष आवड असलेल्या हिना यांनी गेल्या 12 - 14 वर्षापासून नंदुरबारच्या समाजकारणात प्रवेश केला आहे. आरोग्य शिबीर आयोजित करून हजारो लोकांवर मोफत उपचार करून आदिवासी समाजात एक मानाच स्थान त्यांनी मिळवलं आहे. अर्थात हे करत असताना वडिलांची साथ त्यांना लाभली, डॉ गावितांनी आपल्या सत्तेचा वापर डॉ हिना यांना जिल्ह्यात स्थापित करण्यासाठी केला. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून डॉ हिना राजकारणात सक्रीय झाल्या आहेत.
गोवाल के पाडवी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती -
नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसनं केसी पाडवी यांचे चिरंजीव गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली. ऑगस्ट 1992 मध्ये गोवाल यांचा जन्म झाला होता. त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं. त्यांचं एल एल एम 2017 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई झालं आहे. तर 2015 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमधून एल एल बी चं शिक्षण पूर्ण केले आहे. ते सध्या मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत आहेत.
गोवाल के पाडवी यांना संविधानामध्ये विशेष रुची आहे. सायबर लॉ मध्ये विशेष प्राविण्य मिळवलं आहे. इंटलेक्चल प्रॉपर्टी राइट्स वर विशेषण अभ्यास आहे. वैद्यकीय क्षेत्राशी निगडित कायद्यांचाही अभ्यास आहे.