जळगाव : आता मोदी आणि शाहांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंचे आमदार आणि खासदार हे भाजपच्या जीवावर निवडून आले, आम्ही नसतो तर यांचे 15 आमदार तरी निवडून आले असते का? असा सवाल राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला. पावसात भिजल्याने किंवा रडल्याने निवडणुका जिंकता येत नाहीत असा टोलाही त्यांनी आमदार रोहित पवारांनी लगावला.
शिवसेनेचे आमदार-खासदार भाजपच्या भरवशावर निवडून आले
गिरीश महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरे किती वर्ष आमच्या सोबत होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंना सर्व गोड वाटलं का? ज्यावेळी सोबत होते त्यावेळी उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदींचे कौतुक करत होते. आता विरोधात गेले म्हणून काहीही बोलावं का? आमच्या भरवशावरच तुमच्या 18 जागा निवडून आल्या. शिवसेनेचे खासदार, आमदार कुणाच्या भरशावर निवडून आले होते? आम्ही नसतो तर 15 आमदार तरी उद्धव ठाकरे यांना निवडून आणता आले असते का? याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं.
रडल्याने निवडणुका जिंकता येत नाहीत
मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवारांसह रोहित पवारांवर टीका केली. ते म्हणाले की, कधी पावसात भिजायचं, कधी रडायचं, कधी आजारी पडायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. शरद पवारांची तब्येत खराब असते, त्यांच्या तब्येतीवर बोलणं उचित होणार नाही. मात्र रोहित पवार हे थोडं काही झालं की लगेच रडायला लागतात. मला वाटतं रडून निवडणुका लढता किंवा जिंकता येत नाहीत. तुम्ही फार वेळ मतदारांना भावनिक करू शकणार नाहीत. मला असं वाटतं की त्यांनी मुद्द्यावर बोलावं, विकासावर बोला कामावर बोलावं आणि त्यावर मत मागावी.
गिरीश महाजन म्हणाले की, "संजय राऊत यांच्या जिभेला कुठलेही हाड नाही. कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही असं संजय राऊत बोलतात. संजय राऊत यांच्या बोलण्याला आता मी महत्त्व देत नाही. जनता ही संजय राऊत यांच्या बोलण्याला महत्त्व देत नाही."
आनंद दिघे यांच्याकडून पद घेण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव होता असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ शिंदे सांगत आहेत तर त्यात तथ्य असेल.
एकनाथ खडसे भाजपचा प्रचार करतात हे चांगलं
एकनाथ खडसेंकडून रक्षा खडसेंचा प्रचार सुरू आहे. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर मात्र गिरीश महाजन यांनी चुप्पी साधली. एकनाथ खडसे हे रक्षा खडसे यांचा प्रचार करत आहेत हे चांगलं आहे. खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत माहिती नाही, माहिती मिळाल्यावर बोलेन असंही ते म्हणाले.
ही बातमी वाचा: