Naresh Mhaske :  सध्या संपूर्ण देशासह राज्यभरात लोकसभा निवडणुकांचं वातावरण आहे. त्यातच महाराष्ट्रातील लढाई ही सध्या प्रत्येकाच्या अस्मितेची झालीये. शिवसेनेच्या फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळाली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बाळासाहेबांचे विचार आणि आनंद दिघे यांची भूमिका असल्याचं म्हणत आमचीच खरी शिवसेना हा दावा केला. महायुतीत सामील झालेल्या शिंदेंना लोकसभा निवडणुकांसाठीही तगड आव्हान उभं करायचं होतं. अनेक मतदारसंघ हे त्यांच्या अस्मितेचे आहेत. त्यातच ठाण्याचा मतदारसंघ त्यापैकी एक. ठाण्यातून शिंदे गटाकडून नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांना उमेदवारी देण्यात आलीये. त्यामुळे नरेश म्हस्के हे त्यांचा जोरदार प्रचार करत असल्याचं चित्र आहे. नुकतच त्यांनी ठाण्यातील त्यांच्या सभेतून 'धर्मवीर' या सिनेमावरुन ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. 


नरेश म्हस्के यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून राजन विचारेंना मैदानात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे ठाण्याची लढाई ही पूर्वी एकच असलेल्या पक्षाच्या दोन गटांत होणार आहे. नरेश म्हस्के आणि राजन विचारे यांच्या आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरुच आहे. त्यातच धर्मवीर सिनेमा आणि काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचा मुद्दा यावेळी नरेश म्हस्केंनी उचलून धरलाय. तसेच धर्मवीर-2 मधून मोठे गौप्यस्फोट होणार असल्याचा दावा देखील यावेळी त्यांनी केला आहे. 


'काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाला दिघेंचं नाव द्यायचं होतं'


ठाण्यातील काशिनाथ घाणेकर हे नाट्यगृह विशेष प्रसिद्ध आहे. आजही अनेक नाटकांचे प्रयोग या नाट्यगृहात होतात. यावरुन नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाला आनंद दिघे यांचा नाव देणार होतो, पण आदेश आला की कलाकाराचं नाव द्या. म्हणून काशिनाथ घाणेकरांचं नाव दिलं. 


धर्मवीर-2 मध्ये मोठे गौप्यस्फोट करणार


तसेच दिघे साहेबांचा सिनेमा देखील काढून देत नव्हते असाही आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे. यावर त्यांनी म्हटलं की, 'मला दिघे साहेबांचा सिनेमा काढून देत नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांचा सिनेमा निघाल्यानंतर दिघे साहेबांचा सिनेमा काढला. म्हणून हा सिनेमा काढायला वेळ लागला.त्यातही अर्धा सिनेमा पाहून उद्धव ठाकरे निघून गेले. आता याचा पार्ट 2 येतोय, त्यामुळे कळेल जे काय खरं खरं आहे.' 


ही बातमी वाचा : 


Kangana Ranaut : 'निवडणूक जिंकले तर बॉलीवूड सोडून देईन', कंगना रणौतची मोठी घोषणा; राजकारणातच स्वत:ला झोकून देणार