Satara: राज्यात महापालिकेनंतर आता  जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूका होत आहेत . या पार्श्वभूमीवर या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी साताऱ्यात केली आहे. मुख्यमंत्री देवा भाऊ यांना त्यांनी विनंती करत 'उमेदवार फोडून त्यांच्यावर जेवढा खर्च करता त्यापेक्षा कमी खर्च हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी खर्च करता येईल' असे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत. 

Continues below advertisement

काय म्हणाले बिचुकले?

बिचुकले म्हणाले,"साताऱ्यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत होत असताना राज्यामध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी असं सरकार असून खाली एकमेकांविरुद्ध लढायचं हे म्हणजे जनतेला मूर्खात काढण्याचं काम आहे. पुण्यातील निवडणुकीत अजितदादा यांना शिव्या घालण्यात आल्या. त्यामुळे अजितदादा तुम्ही माझा आदर्श घ्या, मी कोणाच्या दारात जात नाही, असा सल्ला देखील अभिजीत बिचुकले यांनी अजित पवार यांना दिला आहे. त्याचबरोबर भाजपच्या बैठकीतून उदयनराजे निघून गेल्याच्या घटनेवर बोलताना अभिजीत बिचुकले यांनी, उदयनराजेनी विचार करावा एकीकडे देवेंद्र फडणवीस तुम्हाला मालक म्हणतात आणि दुसरीकडे भाजपने तुमची काय अवस्था केली आहे. याचा विचार तुम्ही जरूर करावा, असे अभिजीत बिचुकले यांनी म्हटले आहे. 

कोण आहे अभिजित बिचुकले?

अभिजीत बिचुकले हे त्यांच्या चित्रविचित्र बोलण्यामुळे राज्यभरात प्रसिद्ध आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेक खळबळजनक वक्तव्य केली आहेत. बिग बॉसच्या 15 व्या पर्वात ते दिसले होते. 'मला पंतप्रधान व्हायचे आहे, मी आणि एलॉन  मस्क एकत्र आलो तर जग जिंकू' असं वक्तव्य यापूर्वी त्यांनी केलं होतं. विधानसभा निवडणुकीत त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. बिग बॉसमध्ये प्रसिद्धी मिळवलेले अभिजीत बिचुकले अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात, ज्यात बॉलिवूड स्टार आणि शो होस्ट सलमान खानशी झालेल्या वादाचा समावेश आहे, त्यांनी यापूर्वी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांसारख्या प्रमुख नेत्यांविरुद्ध निवडणूक लढवली आहे.

Continues below advertisement