Pawar Vs Pawar : एकीकडे महाराष्ट्रात लवकरच देशपातळीवर तयार झालेल्या विरोधी पक्षाच्या फळीची बैठक पार पडणार आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाला (Sharad Pawar Camp) लागलेली गळती अद्याप सुरुच आहे. आता लवकरच शरद पवार गटातील एक बडा चेहरा अजित पवार गटाला (Ajit Pawar Camp) पाठिंबा देण्याची शक्यता आहे.  


विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षात वसलेल्या जयंत पाटील (Jayant Patil) यांना उद्देशून तुमचं आमच्याकडेच लक्ष नाही असा टोला मारला आणि राज्यात पुन्हा एकदा शरद पवार गटातील बडा नेता अजित पवार गटाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या.


2 जुलै रोजी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वात सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde Fadnavis Government) सहभागी झाला. यानंतर शरद पवार गटातून अजित पवार गटात जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच होती आता त्यात आणखी एका मोठ्या नेत्याची भर पडणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे


'तो' नेता लवकरच मंत्रिपदाची शपथ घेणार


एबीपी माझाला मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार संबंधित नेत्याने अधिवेशन काळात भाजपचे राज्यातील वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची देखील भेट घेतली आणि आगामी काळातील घडामोडींबाबत चर्चा केली. लवकरच सदर नेता आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.


राज्यात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत असून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्यासोबत आगामी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये शिवसेना आणि भाजपमधील नेते तर असतीलच पण राष्ट्रवादीतील नेता देखील शपथ घेताना पाहायला मिळेल.


मविआसोबत असल्याची पवारांची ठाम भूमिका


पक्षातील नेते जात असताना शरद पवार यांनी मात्र आपण महाविकास आघाडीसोबत असल्याची भूमिका ठामपणे कार्यकर्त्यांजवळ मांडली आहे. यासोबतच लवकरच राज्यभर दौरा करुन पुन्हा पक्ष उभा करणार असल्याचे देखील माहिती आहे. यावेळी तरुण फळी निर्माण करण्यासाठी शरद पवार आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे


शरद पवारांसोबत किती वरिष्ठ नेते थांबणार?


केंद्रीय यंत्रणांच्या दबावामुळे सत्ताधारी पक्षात सहभागी होण्यासाठी अनेकजण इच्छुक असताना शरद पवारांनी मात्र या वयात देखील हार न मानता पुन्हा लढाईसाठी सज्ज असल्याचे जाहीर केलं आहे. त्यामुळे शरद पवारांचा दौरा सुरु होण्यापूर्वी शरद पवारांजवळ किती वरिष्ठ नेते थांबणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.


VIDEO : Sharad Pawar Meeting : शरद पवार गटातील आणखी एक मोठा नेता दादांच्या गटात?