भिवंडी : भिवंडी लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अधिकृत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेल्या उमेदवाराचे एबी फॉर्म, पॅनकार्ड, आधारकार्ड अशी महत्वाची कागदपत्र आपल्या ताब्यात ठेऊन त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून वंचित ठेवल्याप्रकरणी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात एका इसमाविरोधात शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वंचितच्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखलं


कल्याण येथे राहणारे कृषी विभागात सेवानिवृत्त मिलिंद देवराम कांबळे हे वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून भिवंडी लोकसभेत उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. त्यासाठी त्यांनी फॉर्म भरण्याची जबाबदारी उल्हासनगर येथील मिलिंद काशिनाथ कांबळे याच्याकडे दिली होती.


एका विरोधात गुन्हा दाखल


अधिकृत उमेदवार असलेले मिलिंद देवराम कांबळे यांच्याकडील पक्षाचे एबी फॉर्म आणि इतर महत्वाची मूळ कागदपत्रे आपल्या ताब्यात घेऊन केवळ नामसाधर्म्य असल्याचा फायदा घेत मिलिंद देवराम कांबळे यांचा अर्ज प्रक्रिया पूर्ण न करता मिलिंद काशिनाथ कांबळे या नावाने वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारी अर्ज दाखल करून उमेदवारी अर्ज भरण्यापासून मिलिंद देवराम कांबळे यांना वंचित ठेवून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात भामटा मिलिंद काशिनाथ कांबळे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नेमकं काय घडलं?


भिवंडी लोकसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी पक्षाने जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांना पाठिंबा जाहीर केला होता. पण 30 एप्रिल रोजी निलेश सांबरे यांनी अपक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नाराज झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही बाब पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिल्याने पक्षाने मिलिंद देवराम कांबळे यांच्यासाठी अधिकृत उमेदवारीसाठी एबी फॉर्म दिला होता, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगर शहराध्यक्ष उज्वल महाले यांनी दिली आहे.


आरोपी मिलिंद काशिनाथ कांबळे हा फिर्यादी यांच्या विश्वासातील असल्याने त्याच्याकडे वंचितच्या भिवंडी आणि कल्याण मतदार संघाच्या उमेदवारांची उमेदवारी अर्ज भरण्याची जबाबदारी दिली होती. त्याने कल्याणच्या उमेदवाराचा अर्ज भरला. मात्र भिवंडीच्या उमेदवाराच्या नावात साधर्म्य असल्याने त्याने वंचितच्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज न भरता स्वतःचा अर्ज दाखल केला आणि अधिकृत उमेदवारांची खरी मूळ कागदपत्र घेऊन पळून गेला. तसेच आरोपीने स्वतःच्या नावाने बारामती तर पत्नीच्या नावाने नांदेड लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती देखील तपासात समोर आली असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत अशी प्रतिक्रिया भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांनी दिली आहे.


दरम्यान, मिलिंद काशिनाथ कांबळे यांचा शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. अर्जासोबत त्यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाचा एबी फॉर्म देखील भरला होता, मात्र शनिवारी अर्ज छाणणीत त्यांच्या एबी फॉर्ममध्ये वडिलांच्या नावात बदल असल्याने एबी फॉर्म बाद करत त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आला आहे, अशी माहिती भिवंडी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.