Priyanka Chaturvedi: कॉलेजमध्ये शिकवले जात असलेल्या एका पुस्तकाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या पुस्तकाच्या पृष्ठावर जे काही लिहिले आहे, ते लोकांना आश्चर्यचकित करणारे आहे. यामध्ये लग्नाशी संबंधित हुंड्यासारख्या गैरप्रकारांचे फायदे अभ्यासक्रमात शिकवले जात आहेत. हे पाहून अनेक लोकांना आश्चर्य वाटत असून या पुस्तकात विद्यार्थ्यांना काय शिकवले जाते आणि याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
काय लिहिलं आहे या पुस्तकात
या पुस्तकाच्या पृष्ठावर हुंड्याचे फायदे सांगताना लिहिलं आहे की, हुंडा घेतल्याने नवीन घर उभं करण्यास मदत होते. हुंड्यामध्ये फ्रीज, टीव्ही, गाद्या अशा गोष्टी दिल्या जातात. दुसरे म्हणजे ही वडिलांच्या बाजूने मुलीची मालमत्ता आहे. तिसर्या मुद्द्यात असे लिहिले आहे की, मुलीच्या लग्नात हुंडा कमी द्यावा लागेल या भीतीने लोक आपल्या मुलींना शिक्षण देत आहेत, हे चांगले आहे. यानंतर चौथ्या आणि सर्वात वादग्रस्त मुद्द्यावर लिहिले आहे की, हुंड्याच्या मदतीने कुरूप मुलींचे लग्न करणे सोपे होते.
हा व्हायरल फोटो ट्विटरवर शेअर करत शिवसेना नेत्या आणि राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी लिहिले आहे की, ''मी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अशी पुस्तके अभ्यासक्रमातून काढून टाकावीत ही विनंती करते. हुंड्याचे फायदे सांगणारे पाठ्यपुस्तक खरोखरच आपल्या अभ्यासक्रमात असू शकते का? ही देशासाठी आणि राज्यघटनेसाठी लाजिरवाणी बाब आहे.'' दरम्यान, हे पुस्तक बीएससी द्वितीय वर्षाचे आहे. 'Textbook of sociology for nurses' हे पुस्तक टीके इंद्राणी यांनी लिहिले आहे.