मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील 6 आरोपी सध्या बीडच्या (Beed) कारागृहात असून न्यायलयीन कोठडीत आहेत. याप्रकरणाची सध्या न्यायालयीन सुनावणी सुरू झाली असून आरोपींचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे, पुढील सुनावणींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, बीड कारागृहात आज सकाळी कैद्यांच्या दोन गटामध्ये राडा झाला. परळीतील बापू आंधळे खून प्रकरणामध्ये कारागृहात असणार्या महादेव गिते आणि वाल्मिक कराड व सुदर्शन घुले यांच्यात हा राडा झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. आता, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनीही तुरुंगातील घटनेसंदर्भात माहिती दिली. त्यानुसार, सकाळी तुरुंगात जोरजोरात भांडणं झाली असून वाल्मिक कराडला 1-2 चापट्या मारल्याचेही दमानिया यांनी म्हटले.
मला जी माहिती मिळालीय त्यानुसार, बीडच्या जेलमध्ये जे झालं ते जोरजोरात भांडणं झाली. त्यामध्ये, एक-दोन चापटा वाल्मिक कराडला मारण्यात आल्या आहेत. मात्र, जोरजोरात आरडाओरड आणि भांडणं झाल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली. तसेच, येथील दोन गटांत असलेली टोकाची भांडणं पुढे येत आहेत. त्यामुळे, बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा अभाव आहे हे पुन्हा एकदा अधोरेखीत झालं आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत, याची काळजी सरकारने घ्यायला हवी, असेही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
बापू आंधळे खून प्रकरणात महादेव गिते आणि अक्षय आठवले यांना वाल्मिक कराड याने खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचे सांगितले जाते. त्याचा राग या दोघांच्या मनात असल्याने त्यांनी वाल्मिक कराडला मारहाण केली असावी, अशी शक्यता भाजप आमदार सुरेश धस यांनी बोलून दाखवली. वाल्मिक कराड याने अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार केले आहेत. त्यामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता धस यांनी व्यक्त केली.
तुरुंगातील मारहाण हे सोंग?
तुरुंगातील मारहाण हे सोंग असू शकतं, अशी शंका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केली आहे. संतोष देशमुख प्रकरणातले आरोपी सोंग करणारे आहेत, लोकांना वेड्यात काढण्याचा प्रकार असू शकतो. हे आरोपी आजारी पडतात, दुसऱ्या जेलमध्ये जाऊ द्या म्हणतात. मारामाऱ्या नाही झाल्या तरी झाल्या म्हणतील. त्यामुळे, यातील अधिकृत माहिती येणे गरजेचे आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. मारहाण झाली का कसे ते माहिती नाही, जेल प्रशासनालाच याबाबत माहिती असेल. पण ते सोंग असू शकतं, असेही जरांगे पाटील यांनी म्हटलं.