बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावात भेट देऊन पीडित देशमुख कुटुंबीयांचं सांत्वन केलं. यावेळी, खासदार बजरंग सोनवणे व आमदार संदीप क्षीरसागर हेही त्यांच्यासमवेत उपस्थित होते. शरद पवारांनी मृत संरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर, त्यांच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचं जाहीर केलं. यावेळी, ग्रामस्थांनी शरद पवारांसमोर आक्रोश करत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील मागणी केली. तसेच, आमदार-खासदारांनीही देखील या घटनेमागील सूत्रधार शोधून त्यांना अटक करण्याची मागणी केली. यावेळी, आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांनी थेट धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) यांचे नाव घेऊन तेच याप्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचे म्हटले. त्यांच्यामुळेच बीड जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण झाल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला.
पीडित देशमुख कुटुंबीयांच्या शिक्षणाची जबाबदारी साहेबांनी घेतली आहे. पण, देशमुख कुटुंबीयांसाठी आमदार, खासदार म्हणून तुम्ही गावकरी जे जबाबदारी द्याल ती आम्ही स्वीकारू. सगळ्यात महत्त्वाचं साहेब, ह्या मागे मास्टरमाईंड वाल्मिक कराड आहे, त्यानेच ही काशी केलीय. आपल्याला रडून जमणार नाही. आम्ही मी आणि बप्पांनी हा विषय सभागृहातही मांडला आहे. भविष्यातही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही गप्प बसणार नाही. उद्या सर्वच पक्षांची बैठक आम्ही बोलवत आहोत. खंडणीच्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव टाकलं आहे, जे 6 तारखेला टाकलं पाहिजे होतं. त्यातही अटक झालं नाही, 302 मध्येही मुख्य सुत्रधार तोच आहे. कुटुंबीय देखील त्याचं नाव घ्यायला घाबरत आहेत, दोन समाजात भांडणं लावण्याचं कामही त्यानेच केलंय, असे म्हणत संदीप क्षीरसागर यांनी थेट वाल्मिक कराड यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय.
शरद पवारांचा रोख कुणाकडे
बीमध्ये जे घडले त्याने सर्वसामान्य लोकांना धक्का बसला. महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला हातभार लावणार लोक इथे आहेत, अशा जिल्ह्यात जे घडले ते कुणालाही न पटणारे आहे. सरपंचाची हत्या झाली, जे घडले ज्यात काहीच संबंध नसताना त्यांची हत्या झाली, हे चित्र आतिशय गंभीर आहे. या घटनेची नोंद राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावी. या घटनेत आरोपींचा संवाद कुणा-कुणासोबत झाला, हे शोधले पाहिजे. जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा हा प्रश्न विधानभवनात मांडला, ते कोणत्या जातीचे आहेत, समाजाचे आहेत हे त्यांनी बघितले नाही, असे म्हणत नाव न घेता शरद पवारांनी थेट वाल्मिक कराडांकडे निशाणा लावल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता, 17 विधेयकांना मंजुरी; पुढील अधिवशेन मुंबईत, तारीखही ठरली