लातूर : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या शांतता रॅलीला हिंगोलीतून सुरुवात झाली आहे. हिंगोली, परभणी, नांदेडनंतर आता लातूरमध्येही मनोज जरांगे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. लातूरमधील भाषणातून पुन्हा एकदा मनोज जरागें यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर निशाणा साधला. तसेच, बीडमधील शांतता रॅलीला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली असली, तरीही बीडमध्ये शांतता रॅली काढणारच असल्याचा निर्धार जरांगे यांनी बोलून दाखवला. यावेळी, नाव न घेता पालकमंत्री धनंजय मुंडेंनाही (Dhananjay Munde) लक्ष्य केलं. जरांगे यांनी लातूरमधील भाषणातून लोकसभा निवडणुकीतील पाडापाडीचं, मतांचं गणितही सांगितलं आहे.  


बीड जिल्ह्यातील मराठे 11 तारखेला, शहरातील मराठे, गावखेड्यातील मराठे घराला दारं-कुलपं लावून रॅलीला येणार आहेत. म्हाताऱ्या माणासांपासून लेकरं, नोकरदारसुद्धा घरी राहणार नाहीत. फडणवीस साहेब आणि अजित पवार यांच्या सांगण्यावरुन बीडच्या पालकमंत्र्यांनी तिथल्या एसपीला सांगून तिथली रॅलीची परवानगी रद्द केली. तरीही सांगतो, बीडची रॅली बीडमध्ये शांततेत होणार... असे म्हणत बीडमध्ये 11 जुलै रोजी शांतता रॅली होणारच असे जरांगे यांनी ठणकावून सांगितले. यावेळी, अप्रत्यक्षपणे त्यांनी धनंजय मुडेंवर निशाणाही साधला. 


बीडच्या पालकमंत्र्यांना असला जातीवाद शोभत नाही, आम्ही नाही कधी जातीवाद केला. 5-5 पिड्या तिथल्या मराठ्यांनी तुम्हाला मोठं करायचं काम केलं, आम्ही जातीवादी नसून आमच्या लेकरांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. फडणवीस साहेबांना माझा 6 वा सवाल आहे, आत्तापर्यंत ओबीसींच्या नेत्यांना निवडून दिलं, ओबीसींना एकगठ्ठा मतदान केलं, आम्ही कधीही ओबीसींना जातीवादी नाही म्हटलं. आम्ही असं म्हणलो, तुमची जात एकत्र आहे राव, आमची जात कवा एक होईल. पण, आमची जात एकदा एकत्र आली तर तुमचं भयानक पोट दुखायला लागली. आम्ही एकगठ्ठा मतदान केलं तर आम्ही जातावादी, पण तुम्ही एकगठ्ठा मतदान केलं तर जातीवाद नाही?, व्वा रे नाय.. असे म्हणत मनोज जरांगे यांनी नाव न घेता ओबीसी नेत्यांवर हल्लाबोल केला. 



जरांगेंनी मतांचं गणित सांगितलं


मराठ्यांना जातीवादी म्हटल्यावर कसा कार्यक्रम लावला. मी तर केवळ पाडाच म्हटलो होतो, कुणाचं नावही घेतलं नव्हतं. पण, एक चूक आपल्याकडून झाली. कुणाला पाडायचं हे सांगितलं नसल्यामुळे 10 हजार मराठ्यांनी तिसऱ्यालाच मतदान केलं. तर, 20 हजार मराठ्यांनी मतदानच केलं नाही. त्यामुळे, 30 हजार मतदान आमचं वाया गेलंय, असं गणितही जरांगे पाटील यांनी लातूरमधून मांडल्याचं दिसून आलं. कारण, कुणाचंही नाव न घेतल्यामुळे नेमकं कुणाला पाडायचं हे काहींना समजलं नाही, त्यामुळे 30 हजारांचं मतदान वाया गेल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं.