बीड: बीड जिल्ह्यातील जनतेने माझ्यावर खूप प्रेम केले आहे. पण मी शरद पवार साहेबांना सोडले तर पब्लिक मला मारेलच, पण बायकोही नाश्ता द्यायची नाही, अशी मिश्कील टिप्पणी बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी केली.  अमोल मिटकरी यांनी मंगळवारी बजरंग बप्पा हे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र, बजरंग सोनवणे यांनी हे सर्व आरोप नाकारले होते. यानंतर त्यांनी बुधवारी बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 


यावेळी बजरंग सोनवणे यांनी अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अजित पवार यांच्या बंगल्यावर कोणाचे कॉल येतात, हे समजायला अमोल मिटकरी हे काय टेलिफोन ऑपरेटर आहेत का? कारण अजितदादांच्या बंगल्यावर कोणाचे कॉल येतात, याची माहिती त्यांच्या टेलीफोन ऑपरेटरकडेच असू शकते. कुणाला काय राजकारण करायचं ते करुद्या, त्याला काय उत्तर द्यायचं, ते मी बघेन. शरद पवारांची ताकद महाराष्ट्रच काय, तर अख्ख्या देशाने पाहिली आहे, ती पचवता येत नसल्याने संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं जात आहे, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले.


शरद पवार साहेबांचे आठ खासदार राज्यभरात निवडून आले आहेत. माझ्यासारखा एखादा आमदार इतर कोणाच्या संपर्कात गेला तर त्याला पब्लिक तर मारेलच... घरात माझे वडील मारतील, माझी बायको मला नाश्ता द्यायची नाही, उलट ज्यांचा एखादा खासदार आहे, त्यांना शरद पवारांच्या संपर्कात येता येईल. यांच्यावर काय बोलायचं, असे सोनवणे यांनी म्हटले. अमोल मिटकरी हे काही दिग्गज नाव नाही. त्याने ट्वीट करावं आणि मी दखल घ्यावी... दखलपात्र माणसाची दखल घेतली जाते, असा टोलाही बजरंग सोनवणे यांनी लगावला.


अमोल मिटकरींनी नेमका काय दावा केला होता?


अमोल मिटकरी यांनी मंगळवारी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते की,  एक तर सकाळी गळाला लागल्यासारखा दिसतोय, बोलतोय लवकर मोठा पिक्चर तुम्हाला दिसेल. यावरुन अजित पवार हे राज्याच्या केंद्रस्थानी महत्त्वाची व्यक्ती आहे, हे सिद्ध होत आहे. एखाद्याच्या साखर कारखान्याचा प्रश्न असेल आणि तो व्यक्ती दुसऱ्या गटाचा खासदार असेल आणि तो दादांना विनंती करत असेल तर माझ्यासारख्या राष्ट्रवादीच्या आमदाराला ही भूषणावाह बाब आहे. आज तुम्ही ट्रेलर पाहिला आता विरोधकांकडून स्पष्टीकरण साहजिक आहे. आता आम्ही पण वाट पाहतो की, ते काय स्पष्टीकरण देतात. आमचे चुकीचे असेल संबंधित नेत्यांते कॉल डिटेल्स काढा तुम्हाला कळेल. दुपारी देखील फोन येऊन गेल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी तुम्ही बघा आगे, आगे देखो होता है क्या? असे मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.


आणखी वाचा


Bajrang Sonawane: लोक माझी लायकी विचारत होते, बीडच्या जनतेने माझी लायकी दाखवून दिली, शरद पवारांसमोर बजरंग सोनवणेंचं धगधगतं भाषण