बीड : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून बीड (Beed) जिल्हा आणि अवादा कंपनी चांगलीच चर्चेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अवादा कंपनी आणि वाल्मिक कराड व त्याची दहशत चर्चेचा विषय बनला होता. त्यावेळी, देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी बीडकर जनता रस्त्यावर उतरली, विधिमंडळातही याचे पडसाद उमटले, त्यातूनच तत्कालीन मंत्री धनंजय मुंडेंना आपला राजीनामा द्यावा लागला होता. आता, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात याच अवादा कंपनीविरुद्ध शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना एका शेतकरी (Farmers) महिलेचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांनी ट्विट करत, हा राजकीय खूनच असल्याचे म्हटले.
आवादा कंपनीच्या विरोधात केज येथील तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सहभागी एका शेतकऱ्याच्या आईचा यादरम्यान मृत्यू झाल्याने आंदोलक शेतकरी संतप्त झाले होते. आंदोलन सोडून आम्ही अंत्यविधीला जाणार नाही असा पावित्रा घेत सर्वांनी त्या महिलेचा मृतदेह तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी आणून ठेवला. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आणि दडपशाही करणाऱ्या आवादा कंपनीवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. तसेच, त्या महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार देखील केला जाणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा या आंदोलकांनी घेतला होता. आता, केजमधील या घटनेवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन संताप व्यक्त केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांचा ट्विटरवरुन संताप
केज तहसील कार्यालयासमोर आवादा कंपनी च्या मनमानी कारभारा विरोधात बेमुदत आंदोलन करणाऱ्या उपोषणकर्त्या महिलेचे निधन झाले. ही अत्यंत गंभीर आणि दुःखद घटना आहे. कंत्राटदार हर्षल पाटीलनंतर हा देखील राजकीय खूनच आहे. सदर महिलेच्या शेतातून अवादा कंपनीने विजेच्या वायर ओढून नेल्या होत्या, त्याविरोधात उपोषण करत होती. मयत महिलेने स्थानिक प्रशासनाकडे दाद मागितली. पण "आमच्या अखत्यारीत हे प्रकरण येत नाही", असं पत्र तहसीलदाराने सदरील महिलेस दिले, अशी प्राथमिक माहिती असल्याचे आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अखेर शेवटचा उपाय म्हणून ही महिला उपोषणाला बसली असताना तिचा जीव गेला. आत्महत्या करत आधी शेतकरी आपला जीव देतच होते, पण आता उपोषण करताना देखील त्यांचे जीव जात आहेत. कृषिप्रधान देशाला ही काळिमा फासणारी घटना आहे, असे म्हणत आव्हाड यांनी सरकारला लक्ष्य केलं.