पुणे : खात्याला मूर्ख मंत्री भेटलाय, चोर साला, तो म्हणजे निव्वळ.... अशा शब्दात अपक्ष आमदाराने राज्याच्या मंत्री (Minister) महोदयांविरुद्ध अपशब्द वापरले असून या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. आता मी मुख्यमंत्र्यांसमोर त्यांना उभं करणार आहे, सोबतच घोडेगाव प्रकल्प विकासाचे अधिकारी प्रदीप देसाईंची ही झाडाझडती करणार आहे. आदिवासी विकास खात्याच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करताना, ही भाषा सत्ताधारी शिवसेना (Shivsena) शिंदे गटास पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदार शरद सोनवणे (Sharad sonavane) यांनी वापरली आहे. सरकारी कार्यालयातील त्यांचा हा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. त्यामुळे आमदार सोनवणे चांगलेच अडचणीत आले आहेत. आता, सोनवणेंनी देखील हा व्हिडीओ पाहुन कबुली देत स्पष्टीकरण देखील दिलं आहे. 

मी असं बोललोय पण ते मी मंत्र्यांना उद्देशून नव्हे तर घोडेगाव प्रकल्प विकास अधिकारी देसाईबद्दल बोलल्याचा खुलासा सोनवणेंनी एबीपी माझाशी फोनवर बोलताना केला. आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आज जुन्नरमध्ये बैठक होती. या बैठकीत आदिवासी समाजाच्या विकासासाठी असलेल्या घोडेगाव प्रकल्पाचे अधिकारी देसाईंची मी झाडाझडती घेतली. ते समाजाच्या हिताचे काम करत नाहीत, त्यांच्याविरोधात माझ्या खूप तक्रारी आलेल्या आहेत. या देसाईंना गोरगरिबांचे काही पडलेलं नाही, असं असताना देसाई मंत्र्यांच्या मात्र पुढं-पुढं करतो. त्यामुळे, मी देसाईंवर संतापलो. त्याचं देसाईंना मी संबंधित खात्याचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसमोर उभं करुन, झाडाझडती घेणार, असं मी म्हणालो असं स्पष्टीकरण आमदार सोनवणे यांनी दिलं आहे.  

आपल्याकडे असलेल्या व्हिडीओमधील संताप हा मंत्र्यांबद्दल नव्हे तर अधिकाऱ्याला उद्देशून असल्याचं सोनवणेंचं म्हणणं आहे. पण, हा संवाद ऐकल्यावर प्रथमदर्शनी तर ते मंत्र्यांना उद्देशून बोलल्याचं जाणवत आहे. त्यामुळे, एक सत्ताधारी आमदार आपल्याच महायुती सरकारमधील मंत्र्याला उद्देशून असे शब्द वापरत असतील, तर सर्व सामान्यांची काय अवस्था असेल हे सांगण्यासाठी कोणत्या शब्दांची गरज नक्कीच नाही. कारण, मंत्र्‍यांचा अधिकाऱ्यांवर वचक राहिलेला नाही, अधिकारी सर्वसामान्यांचं ऐकत नाहीत, असं नेहमीच पाहायला मिळतं.  

आमदारांची ही अवस्था असेल, तर सर्वसामान्यांचं काय? 

शरद सोनवणे यांच्या म्हणण्यानुसार ते अधिकाऱ्यांना उद्देशून बोललेत असं गृहीत धरलं, तरी एखाद्या लोकप्रतिनिधीने अधिकाऱ्यांबद्दल अशी खालच्या पातळीची भाषा वापरावी का? अन् मुळात हा अधिकार सोनवणेंना घटनेने दिलाय का? हा खरा प्रश्न आहे. आता, त्यामुळे अडचणीत आलेल्या सोनवणेंनी केलेला हा खुलासा आणि व्हिडीओमधील संवाद हा नेमका मंत्र्यांच्या की अधिकाऱ्याबद्दल आहे, हे ज्याचं त्यानं समजून जावं. मात्र, दुसरीकडे सोनवणेंचा संताप म्हणजे एका आमदाराचा हा संताप असेल तर सर्वसामान्य जनतेनं अधिकाऱ्यांपढं काय कराव, असाही मोठा प्रश्न आहे.  

हेही वाचा

श्रावणचा पहिला दिवस, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात पासेसचा काळाबाजार उघड; 5 जणांना अटक