बारामती: राज्यात लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु असताना बारामतीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बारामती लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर बारामतीमधील (Baramati Lok Sabha) सर्व मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन्स या एका गोदामातील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आल्या होत्या. ईव्हीएम मशीन्स (EVM Machine) असलेल्या या स्ट्राँग रुमवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून निगराणी ठेवली जात आहे. मात्र, सोमवारी सकाळी या स्ट्राँग रुमचे बाहेरच्या मॉनिटरवर दिसणारे सीसीटीव्ही फुटेज अचानक बंद झाल्याची घटना घडली. त्यामुळे शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.


सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये त्यांनी म्हटले की, ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या स्ट्राँग रुमचं सीसीटीव्ही फुटेज सकाळी 10.25 वाजल्यापासून बंद आहे. यामागे नेमके काय कारण आहे? मी यासाठी त्या विभागाच्या आरओला फोन केला, पण त्यांनी फोन उचलला नाही. तिकडे टेक्निशियन्स नाहीत, आमच्या लोकांना गोदामापर्यंत जाऊ दिले जात नाही. हे सगळं काय चाललंय, असा प्रश्न लक्ष्मीकांत खाबिया  विचारला. सीसीटीव्ही फुटेज बंद असताना काहीतरी काळबेरं होण्याची शक्यता तर नाही ना, असा संशय माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात बळावल्याशिवाय राहत नाही, असेही त्यांनी म्हटले. 


दरम्यान, साधारण पाऊण तासानंतर स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही फुटेज मॉनिटरवर पुन्हा दिसायला लागले. मात्र, या काळात काही गैरप्रकार तर घडला नाही ना, अशी शंका शरद पवार  गटाकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत आता निवडणूक आयोग आणि प्रशासन काय स्पष्टीकरण देणार, हे पाहावे लागेल. 


शरद पवार गटाचा रडीचा डाव: अमोल मिटकरी


बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीनंतर ठेवलेल्या ईव्हीएमच्या ठिकाणचे सीसीटीव्ही बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप हा रडीचा डाव असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली. सुप्रिया सुळे यांचा बारामतीत पराभव होणार असल्यानेच त्यांच्याकडून सातत्याने असे आरोप होत असल्याचे मिटकरी यांनी म्हटले.


शरद पवार गटाच्या आरोपावर निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण


बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील शासकीय गोदामात ठेवण्यात आली आहेत.  याठिकाणी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरा काही वेळासाठी बंद होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आलाय.  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मात्र सी सी टी व्ही कॅमेरे बंद नव्हते असा दावा केला आहे.  केवळ सी सी टी व्ही कॅमेरांची दृश्ये ज्या स्क्रिनवर दिसतात, ती स्क्रिन काही वेळासाठी बंद होती, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


आणखी वाचा


नगरमध्ये निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदान केंद्रावर प्रचार, निलेश लंकेंचा विखेंवर गंभीर आरोप