सोलापूर :राज्यातील महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघातील (Madha Loksabha) लढतींपैकी एक असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. धैर्यशील मोहिते पाटलांनी ऐनवेळी शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर माढ्यात अनेक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळाले. त्यातच, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadanvis) भेट घेतल्याने येथील राजकीय गणितं आणखी बिघडली. त्यातच, आज पंढरपूर येथील जाहीर सभेतून देवेंद्र फडणवीसांनी अभिजीत पाटलांच्या कार्यक्षमतेचं कौतुक करत, विधानसभेच्या तयारीला लागण्याचेही संकेतही दिले आहेत. तसेच, कारखान्याच्या अडचणीचा व कर्जा प्रश्नही पुढील 3 ते 4 महिन्यात मार्गी लागेल, असे आश्वासनही दिले.
माढा व सोलापूर लोकसभा भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर व राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंढरपूर येथे देवेंद्र फडणवीसांची सभा झाली. याच आठवड्यात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेल्या अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी, फडणवीसांनी शायरीतून भाषणाला सुरुवात केली.
बाज की असली उडान अभी बाकी है
तुम्हारे इरांदों का इम्तिहान अभी बाकी है
अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन तुमने
अभी पुरा आसमान बाकी है...
अशी शायरी म्हणत फडणवीसांनी अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वावर भाष्य केलं. कारखान्यावर बोलताना फडणवीसांनी आई व बाळ दोघेही जगवायचं असल्याचं म्हटलं. तसेच, 2018 पासून माझी व अभिजीत पाटील यांची ओळख असल्याचं सांगितलं. महाराष्ट्रात कुठेही बंद पडलेला कारखाना घ्यायचा आणि तो 35-40 दिवसांत सुरू करायचा, अशी किमया पाटील यांना जमली. अभिजीत पाटील सहकार क्षेत्रात राहिले म्हणून, जर ते खासगी क्षेत्रात गेले असते तर.. आम्हालाही वाटलं असतं आमचा एक मराठी माणूस अदानी-अंबानी झाला, अशा शब्दात फडणवीसांनी अभिजीत पाटलांचं कौतुक केलं.
स्टे हटला हा योगायोग
देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांत आणि निवडणूक प्रचारात होत असलेल्या चर्चेवर बोलताना अभिजीत पाटील यांच्या भाजपातील प्रवेशावर भाष्य केलं. काहींनी असा अपप्रचार केला की, अभिजीत पाटलांना आम्ही खिंडीत गाठलंय, पण अभिजीत पाटील खिंडीत येणाऱ्यांपैकी नाही. जो सातत्याने लढतो, त्यांना खिंडीत गाठलं जात नाही. पण, परिस्थिती अशी तयार झाली. कारण, तेव्हाच्या सरकारने तुम्हाला मदत केली नाही. निवडणुकीच्या काळात स्टे हटला आणि अडचण निर्माण झाली, हा योगायोग आहे. मात्र, अभिजीत पाटील यांच्यावर आमचा डोळा होताच. पण, शहाजी बापूंनी मला सांगितलं, अभिजीत माझा भाचा आहे, त्याला मदत करायचीय. तेव्हा हा देवेंद्र फडणवीस चांगलं काम करणाऱ्या सर्वांनाच मदत करतो, असे फडणवीसांनी म्हटलं.
पुढील 3-4 महिन्यात कारखान्याची अडचण दूर
मी अभिजीत पाटलांना सांगितलं, की विठ्ठल परिवाराचे प्रमुख तुम्ही आहात, पण हा परिवार मी दत्तक घेतोय, या कारखान्याची संपत्ती मला नकोय. केवळ, तुम्ही मला प्रेम द्या, असेही फडणवीसांनी म्हटलं. तसेच, अभिजीत पाटील तुम्ही कितीही मेहनत केली, तरी कंबर मोडेन पण यातून बाहेर पडता येणार नाही. यासाठी वेगळंच ऑपरेशन करावं लागेल. ते ऑपरेशन कसं करायचं हे मला आणि तुम्हाला माहितीय, असेही फडणवीसांनी म्हटलं. पुढील 3 ते 4 महिन्यात सरकारकडून या कारखान्याच्या पुनर्वसनाचं काम करू, ही जबाबदारी आता तुमच्यासोबत मी घेतलीय, असा शब्दच फडणवीसांनी येथील जाहीर सभेतून दिला.
विधानसभेच्या तयारीला लागण्याचे संकेत
अभिजीत पाटील काळजी करु नका, कारखाना आणि राजकारण दोन्ही महत्त्वाचं आहे. तुमच्या जे मनात आहे, आणि यांच्या (लोकांच्या) जे मनात आहे, तेच माझ्या देखील मनात आहे,असे म्हणत अभिजीत पाटील यांना अप्रत्यक्षपणे विधानसभेच्या तयारीला लागल्याचेच फडणवीसांनी सूचवले. योग्य मार्गाने सगळ्या गोष्टी करू,नव्या पिढीत असा कार्यकर्ता-नेता उभा राहतो, जो बुडलेल्यांना वर काढतो, तो अभिजीत पाटील आहे, अशा शब्दात फडणवीसांनी अभिजीत पाटील यांच्यावर स्तुतीसुमनेही उधळली.