भंडारा: मानवधर्माची शिकवण देणाऱ्या बाबा जुमदेव महाराज आणि त्यांच्या परमात्मा एक सेवकांबद्दल वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधान बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज उर्फ बागेश्वर महाराज यांनी भंडाऱ्याच्या मोहाडीतही काल सायंकाळी झालेल्या भागवत सप्ताहात केलं. बागेश्वर बाबांच्या या वक्तव्यामुळे बाबा जुमदेव महाराज (Baba Jumdev) यांना मानणाऱ्या हजारो सेवकांच्या भावना दुखावल्या आहेत. या बागेश्वर महाराजांविरुद्ध (Bageshwar Baba) गुन्हे दाखल करून दुपारी 4 वाजेपर्यंत अटक करावी, सुरु असलेला कार्यक्रम बंद करावा अन्यथा बाबा जुमदेव महाराजांचे सेवक कायदा हातात घेऊन बागेश्वर महाराजांना अद्दल घडवतील आणि याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला आहे.
नेहमी वादग्रस्त विधान करून प्रसिद्धी झोतात राहणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज उर्फ बागेश्वर महाराज यांच्या भागवत कथा सप्ताहाचे आयोजन भंडाऱ्याच्या मोहाडीत करण्यात आले आहे. काल सायंकाळी झालेल्या भागवत सप्ताहात महानत्यागी बाबा जुमदेवजी ( महानत्यागी बाबा जुमदेव यांना मानणारा एक मोठा समुदाय पूर्व विदर्भात आहे) यांच्या आणि त्यांच्या सेवकांच्या विरोधात हनुमानजींच्या पुजेवरून भावना दुखावणारं वादग्रस्त विधान केलं. यामुळं भावना दुखावलेल्या परमात्मा एक सेवकांनी आणि बाबा जुमदेव महाराज यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी बागेश्वर महाराजांच्या विरोधात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात काल रात्री तक्रार दाखल केल्यात. यात आता राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उडी घेतली असून शिवसेना समर्थित अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत बागेश्वर महाराजांवर गुन्हे दाखल करून अटक करावी, अशी मागणी केली आहे.
बागेश्वर बाबा नेमकं काय बोलले?
नागपूर आणि भंडारा या क्षेत्रामध्ये एका विशेष संप्रदायाला मानणारा वर्ग आहे. ते हनुमानजींना तर मानतात. मात्र, हनुमानजींची पूजा करणे मानत नाही. श्राद्ध करायचं नाही, माता पित्यांचे फोटो ठेवायचे नाहीत, राम राम बोलायचं नाही, जय गुरुदेव बोला....जो हनुमान संपूर्ण जीवनभर रामराम बोलला, त्यांचे उपासक रामराम नाही बोलणार. हद्द झाली यार....रसगुल्ला खात आहेत...मात्र शुगर असल्याचे सांगत आहेत. असे करणाऱ्या लोकांनी कान उघडून ऐकावं की,तुमचे पूर्वज नरकात गेले आहेत, तुमची येणारी पिढी पण नरकात जाईल. अशी भक्ती हनुमानजींना कधीच प्रिय नाही, असे वक्तव्य बागेश्वर बाबा यांनी भागवत सप्ताहात केले.
बागेश्वर महाराजांच्या वादग्रस्त विधानानंतर भंडाऱ्यात तणावपूर्ण परिस्थिती
बागेश्वर बाबांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भात लाखोंच्या संख्येत असलेल्या बाबा जुमदेवजी यांना मानणाऱ्या परमात्मा एक सेवकांमधुन रोष व्यक्त केला जातोय. सोबतच बाबा बागेश्वरांना अटक करा, या मागणी करिता मोहाडी पोलीस स्टेशन येथे परमात्मा एक सेवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून बाबा बागेश्वरांना तात्काळ अटक करा, अशी मागणी या समुदायामार्फत केली जात आहे. बागेश्वर महाराजांच्या वादग्रस्त विधानानंतर मोहाडीमध्ये ठीक ठिकाणी बागेश्वर महाराजांचे बॅनर्स, पोस्टर्स फाडल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
आणखी वाचा
बागेश्वर बाबा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, रोहित पवारांची खोचक टीका