Bacchu Kadu on Dhananjay Munde Resignation : सरपंच संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh Death Case) करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो सोमवारी रात्री समोर आलेत. यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. तर संतोष देशमुखांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी दबाव वाढत चालला होता. यानंतर धनंजय मुंडे यांनी आज मंगळवारी (दि. 04) अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. मात्र, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा दिल्याचं ट्विट त्यांनी केले आहे. यावरून माजी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केलीय.
बच्चू कडू म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन भागणार नाही. या प्रवृत्तीला खतपाणी कोणी घातलं? या प्रवृत्ती कशाप्रकारे देशभरात आणि राज्यभरात वाढत चालल्या आहेत. पक्ष, कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सत्ता एवढेच शिल्लक राहिलेले आहे. हातात तलवारी घ्या आणि कापा. बलात्कार करा, काहीही करा पण सत्ता आमच्या हाती द्या. एवढा विचार करणाऱ्या राज्यकर्त्यांचा निषेध केला पाहिजे. मारणारा कोणत्या जातीचा होता? मरणारा कोणत्या जातीचा होता? हा विषय महत्त्वाचा नाही. ज्या प्रवृत्तीने आणि ज्या पद्धतीने त्यांना मारलं हे फार वाईट आहे, असे त्यांनी म्हटले.
लोकांना किती लहानपणा दाखवत आहात
बच्चू कडू पुढे म्हणाले की, वाल्मिक कराड सारख्या प्रवृत्तीला दहा, वीस वर्षात खतपाणी घातले गेलं. महाक्रूर दादा या ठिकाणी निर्माण होतो, गुंड निर्माण होते आणि त्याला राजाश्रय मिळते हे फार महत्त्वाचे आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतःचा राजीनामा हा देशमुख यांना श्रद्धांजली देऊन दिला नाही. आजारपणाचे कारण देऊन दिले, असं त्यांनी सांगितलं. ही काय प्रवृत्ती आहे? लोकांना किती लहानपणा दाखवत आहात. तुम्ही मंत्री, आमदार आहात, मोठेपणा घेता आला पाहिजे, अशी टीका त्यांनी यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर केली. तर एकीकडे प्रभू रामचंद्राचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे अशा प्रवृत्तीला खतपाणी घालायचे, असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
धनंजय मुंडे म्हणाले वैद्यकीय कारणास्तव राजीनामा, जितेंद्र आव्हाडांची लेक संतापली; ट्विट करुन सुनावलं