पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज मावळ आणि शिरुर मतदरसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. यावेळी, दोन्ही मतदरसंघातून अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली. शिरुर (Shirur) मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी मतदारांन आवाहन करताना येथील आमदार अशोक पवार यांना सज्जड दमच भरला होता. विशेष म्हणजे यापूर्वी अशाचप्रकारे त्यांनी माजी मंत्री विजय शिवतारेंन दम भरला होता. पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो असे म्हणत अशोक पवार (Ashok Pawar) यांना शिरुरच्या सभेतून अजित पवारांनी इशारा दिला होता. आता, अजित पवारांच्या टीकेला आमदार महोदयांनी जशास तसं उत्तर दिलं. यावेळी, पवार यांनीही शिवतारेस्टाईल उत्तर दिल्याचं दिसून आलं.


शिरुर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आणि राष्ट्रवादीचे नेते आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेताना अजित पवारांनी येथील आमदार अशोक पवार यांनी शरद पवारांची साथ का दिली, यावर भाष्य केलं. "दिलीपराव वळसे पाटलांचा शपथविधी झाला की, याची सटकली. हा म्हणाला दादांनी याला मंत्रीमंडळात घ्यायला नको होते. आता आपलं काही जमणार नाही. त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसलेल्या आमदारांना त्यांनी सांगितलं. मला त्या आमदारांनी घरी आल्या आल्या सांगितले की, ते असं म्हणत होता आणि नंतर तो तिकडे गेला. त्याला गाजर दाखवण्यात आलं आहे. त्याला साहेबांनी सांगितलं की, पुढच्या वेळेस तूच मंत्री होणार आहेस. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्यासाठी त्याने कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांची वाट लावली. आता मंत्री व्हायला निघालायस, पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो", असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांना आव्हान दिले आहे. यापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंडचे माजी आमदार विजय शिवतारेंनाही असाच दम दिला होता. त्यानंतर, खरंच विजय शिवतारे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आणि आमदार झाले नाहीत. त्यानंतर, आता त्याचप्रमाणे अजित पवारांनी शरद पवार पक्षातील आमदार अशोक पवार यांन इशारा दिला.  


काय म्हणाले अशोक पवार


मी छोटा कार्यकर्ता असून मी अजित पवारांबद्दल काही बोलू शकत नाही, असे म्हणत अजित पवारांच्या भाषणावर आता अशोक पवार यांनीही जशास तसे प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी अशी दमबाजीची भाषा वापरणे त्यांना शोभत नाही. माझ्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने थकित कर्ज भरल्यावर देखील नवे कर्ज मिळाले नाही. त्यामुळे कारखाना बंद पडला. इतर कारखान्यांना कर्ज मिळाले, आमच्याच कारखान्यांना कर्ज का मिळाले नाही, असा सवाल आमदार अशोक पवार यांनी उपस्थित केला. तसेच, मी माझ्या कॉलेज जीवनापासून शरद पवारांचा चाहता. त्यामुळेच, मी त्यांना सोडून जाणार नाही. मात्र, मी आमदार व्हायचं की नाही हे शरद पवार आणि जनता ठरवेल, इतर कोणी ठरवू शकत नाही, अशा शब्दात अशोक पवार यांनी अजित पवारांनी दिलेल्या इशाऱ्यावर पलटवार केला आहे.


हेही वाचा


Ajit Pawar : अरे मंत्री व्हायला निघालाय, पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, अजितदादांचे शरद पवारांच्या आमदाराला चॅलेंज