Ashish Shelar and Bhaskar Jadhav : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session 2024) आज शेवटचा दिवस. आजचा दिवस तसा वादळी ठरला. आधी विधीमंडळाच्या लॉबीमध्ये शिंदे गटाचे (Shinde Group) दोन नेते आपापसांत भिडले. त्यानंतर सभागृहात भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यात हमरीतुमरी झाल्याचं पाहायला मिळालं. 


227 आणि 236 वरून आरोप करणारे राजकारण करत आहेत. सभागृह किती वेळ चाललं, याचा आव आणला जातो, पण तुमचं सरकार असताना किती दिवस अधिवेशन घेतलंत, सभागृह चालवलं? असं आशिष शेलार सभागृहात बोलताना म्हणाले. संसद सुरू होती, अन्य राज्यातील विधानसभा सुरू होत्या, यांना आज सभागृहाच्या कामकाजाची आठवण येतेय, असं म्हणत आशिष शेलारांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं.


त्यानंतर याच मुद्द्यावरुन  आशिष शेलार - भास्कर जाधव यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. खडाजंगीनंतर प्रकरण हमरीतुमरीपर्यंत गेलं. आशिष शेलार आणि भास्कर जाधव यांच्यात एकेरी भाषेत हमरीतुमरी झाली. त्यानंतर हे सभागृह आहे, नाचायला स्टेज आहे का? असं म्हणत शेलारांनी भास्कर जाधवांना सणसणीत टोलाही लगावला आहे. 


नेमकं काय घडलं? 


सभागृहात बोलताना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सभागृह किती वेळ चाललं यावर प्रश्न उपस्थित केला. भास्कर जाधव म्हणाले की, विरोधी पक्षांनी घसा कितीही फोडला, कितीही कंठशोष केला, तरी सरकारला त्याचं काही देणंघेणं नाही. कारण सरकार एका मस्तीमध्ये आहे. भास्कर जाधवांच्या प्रश्नाला उत्तर देताना आशिष शेलार संतापले आणि त्यांनी विरोधकांवर थेट टीकास्त्र डागलं. 


आशिष शेलार म्हणाले की, संसद सुरू होती, त्याचवेळी इतर राज्यांत सभागृह सुरू होतं. अहो दोन-दोन दिवस सभागृह चालली, आता तुम्हाला त्रास झाला, त्यावेळी लोकशाही धोक्यात नव्हती. दुसऱ्याकडे बोट दाखवताना इतर चार बोटं आपल्याकडे येतात. त्यावेळी लोकशाही धोक्यात आली नव्हती. त्यावेळी विधेयकांवर चर्चा झाली नव्हती, त्यावेळी लक्षवेधी झाली नव्हती, प्रश्न नव्हते घेतले. मी जे बोलतोय ते रेकॉर्डवरचं बोलतोय. मी पसरट बोलत नाही, मी चार-चार मुद्दे पुन्हा पुन्हा मांडत नाही. आपण केलेली चर्चा उत्तम, समोरच्यानं केलेली चर्चा त्रासदायक.


हा काय स्टेज आहे का नाचायला? काही सदस्यांना सांगा, आले की, इथे नाचायला लागता. बाहेर इथे नाही. अरे नाचता येईना अंगण वाकडं अशी स्थिती आहे यांची, हे काय सांगतात मला, असं म्हणत आशिष शेलार आणि भास्कर जाधव यांच्यात जुंपली. 


पाहा व्हिडीओ : Ashish Shelar And Bhaskar Jadhav : आशिष शेलार भास्कर जाधव यांच्यात एकेरी भाषेत हमरीतुमरी