Ankita Bhandari Murder Case: उत्तराखंडमधील (Uttarakhand) ऋषिकेशमध्ये अंकिता भंडारी हत्या प्रकरणी पोलिसांची सातत्याने कारवाई सुरू आहे. तत्काळ कारवाई करत पोलिसांनी 24 तासांच्या आत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. आता या प्रकरणातील मुख्य आरोपी पुलकित आर्यचे (Pulkit Arya) वडील आणि भाजप नेते विनोद आर्य (Vinod Arya) यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे. आरोपीचा भाऊ अंकित आर्य यांनाही भाजपने पक्षातून काढून टाकलं आहे.


अंकिता हत्या प्रकरणी पुलकित आर्यला अटक झाल्यानंतर भाजपने त्याचे वडील विनोद आर्य आणि भाऊ डॉ. अंकित आर्य यांची पक्षातून हकालपट्टी केली. पक्षाचे राज्य माध्यम प्रभारी मनवीर सिंह चौहान यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट यांच्या सूचनेवरून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


त्याचबरोबर या संदर्भात नोटीसही बजावण्यात आली आहे. भाजपच्या प्रदेश सरचिटणीस यांच्या लेटर हेडवर ही नोटीस बजावण्यात आली आहे. 24 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या या नोटीसमध्ये असे लिहिले आहे की, "अंकिताच्या हत्येची दखल घेत प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट यांनी हरिद्वार जिल्ह्यातील डॉ. विनोद आर्य आणि त्यांचा मुलगा डॉ. अंकित आर्य यांची भाजपमधून तत्काळ प्रभावाने हकालपट्टी केली आहे.''


संतप्त लोकांनी पुलकित आर्यच्या रिसॉर्टला लावली आग 


दरम्यान, अंकिता हत्या प्रकरणाबाबत लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. अंकिताच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुलकित आर्यच्या ऋषिकेश येथील रिसॉर्टचा काही भाग संतप्त लोकांनी पेटवून दिला आहे. याशिवाय उत्तराखंडमधील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनीही याप्रकरणी निदर्शने केली आहेत.


काय आहे प्रकरण? 


मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता भंडारी ही पुलकित आर्यच्या रिसॉर्टमध्ये काम करत होती. मात्र गेल्या पाच दिवसांपासून ती बेपत्ता होती. 19 सप्टेंबर रोजी सकाळी अंकिता तिच्या खोलीत दिसली नाही, म्हणून तिचे वडील रिसॉर्टमध्ये पोहोचले आणि तेथील कर्मचाऱ्यांशी तिच्याबद्दल चौकशी केली. मुलीचा शोध न लागल्याने त्यांनी हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. यातच बेपत्ता झालेल्या अंकिताचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरू होती. यावर डीजीपी अशोक कुमार म्हणाले, पोलिसांकडे याबाबत हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती, यानंतर 24 तासात मुख्य आरोपी पुलकित आर्यसह तीन आरोपींना लक्ष्मण झुला (उत्तराखंडमधील) पोलिसांनी अटक केली आहे. या तीन आरोपींनी अंकिताला टेकडीवरून खाली नदीत ढकलून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. 






 


संबंधित बातमी:


Uttarakhand : भाजप नेत्याच्या मुलाला अटक; महिला कर्मचाऱ्याची हत्या, पोलीसांची गाडी अडवून संतप्त महिलांची आरोपींना मारहाण