मुंबई : बीडमधील सरपंच हत्याप्रकरणावरुन राजकारण तापलं असून मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay munde) राजीनाम्यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढत आहे. त्यातच, धनजंय मुंडेंनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र, या भेटीनंतर त्यांनी बीड प्रकरणावर बोलणे टाळले असून ही भेट केवळ नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी होती, असे त्यांनी म्हटले. दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बीडमधील हत्याप्रकरण व त्यांना येत असलेल्या धमक्यांसदर्भात माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधताना भेटीत काय चर्चा झाली याबाबत सांगितले. तसेच, बीडमधील घटनेसंदर्भाने 5 प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये, वाल्मिक कराड राहत असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, एसआईटी रद्द करण्यात यावी, बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसाठी हॉटलाइन बनवण्यात यावी. बीडमधून तक्रारींचे अनेक कॉल्स येत आहेत. त्यासाठी यावर तक्रार नोंद करून घ्यावी. बीडमधल्या आर्म्ड लाइसन्स रिव्युव्ह करावेत, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. अंजली दमानिया यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बीडमधील गुन्हेगारी व त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल चर्चा केली. त्यानंतर, पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी बीडमधील हत्याप्रकरणात ठोस पाऊले उचलत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बीड हत्याप्रकरणाची सर्व चौकशी ऑन कॅमेरा घेण्यात यावी. वाल्मिक कराड राहत असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात यावा. बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची नेमणूक बिंदू नामावलीप्रमाणे झाली आहे का याची चौकशी व्हावी. तसेच, बीड जिल्ह्यातील बिना नंबर प्लेटची वाहनं ताब्यात घ्यावी. मुख्यमंत्र्यांनी मला जॉईंट सीपी क्राईम आणि मुंबई पोलीस आयुक्तांना तक्रार देण्यास सांगितले आहे. वाल्मिक कराडच्या नावावर अनेक बार आहेत. कायदा धाब्यावर बसवून हे परवाने देण्यात आले आहेत, त्यावर चौकशी आणि कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीतही त्यांनी याबाबत चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
धनंजय मुंडेंना जनाची नाही तर मनाची हवी
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे कसे संबंध आहेत, व्यवहार एकत्र आहेत, जमिनी एकत्र आहेत, कंपनी एकत्र आहे, दहशत एकत्र आहे. याबाबतचे हजारो व्हिडीओ समोर आले असल्याचे अंजडली दमानिया म्हणाल्या. एवढं सगळं होऊनही धनंजय मुंडेंना जनाची नाही मनाचीही लाज वाटत नसेल की आपण राजीनामा दिला न पाहिजे तर ही कठीण परिस्थिती असल्याचे दमानिया म्हणाल्या. मुंडे जोपर्यंत राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत लढायला हवं असेही दमानिया म्हणाल्या. चौकशीच पदोपदी नवनवीन माहिती समोर येत आहे.