Solapur Angar nagarpanchayat: गेल्या काही दिवसांपासून अचानक प्रकाशझोतात आलेल्या सोलापूरमधील अनगर नगरपंचायतीचा निकाल निवडणुकीपूर्वीच स्पष्ट झाला आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन पाटील यांचे गेल्या अनेक वर्षांपासून अनगर ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व आहे. आता अनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये (Angar nagarpanchayat) रुपांतर झाले असून याठिकाणी पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने ती प्रतिष्ठेची झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांची साथ सोडून राजन पाटील यांनी भाजपचे कमळ हातात घेतले होते. त्यामुळे अनगर नगरपंचायत निवडणूक न लढवताच भाजपच्या पदरात पडेल, असा अंदाज होता. मात्र, याठिकाणी अजित पवारांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून उज्ज्वला थिटे (Ujjwala Thite) यांना रिंगणात उतरवून राजन पाटील यांच्या अनगरमधील एकाधिकारशाहीला आव्हान दिले होते. अनगरमध्ये कोणीही उमेदवारच उभा न राहिल्याने राजन पाटील यांच्या पॅनेलच्या 17 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर नगराध्यक्षपदासाठी राजन पाटील (Rajan Patil) यांची सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील या रिंगणात आहेत. मात्र, अजित  पवार यांनी उज्ज्वला थिटे यांना रिंगणात उतरवून दंड थोपटले होते. मात्र, मंगळवारी रात्री नाट्यमयरित्या छाननीदरम्यान उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद ठरवला होता. यानंतर अनगरमध्ये राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. (Solapur News)

Continues below advertisement

राजन पाटील यांच्या समर्थकांनी अनगर नगरपंचायतीसमोर गुलाल उधळत जल्लोष केला. यावेळी राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील आनंदाने अक्षरश: बेभान झाले होते. त्यांनी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांकडे पाहत अजित पवार यांना थेट आव्हान दिले. 'अजित पवार तुम्ही सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाही', असे वाक्य बाळराजे पाटील यांनी बोट दाखवत उच्चारले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओची सध्या सोलापूर जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. आता अजित पवार यावर काही प्रतिक्रिया देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.  

Angar nagarpanchayat news: उज्ज्वला थिटेंचा उमेदवारी अर्ज कसा बाद झाला?

उज्ज्वला थिटे यांनी पोलीस संरक्षणामध्ये अर्ज दाखल केला होता. पण छाननीमध्ये त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे राजन पाटील यांच्या सूनबाई अनगर नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षा बनणार आहेत. उज्ज्वला थिटे यांचा उमेदवार अर्ज बाद करताना निवडणूक अधिकाऱ्यांकडून काहीसे विचित्र कारण सांगण्यात आले. उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवार अर्जावर सूचक म्हणून कोणाचीही सही नव्हती, असे तांत्रिक कारण देऊन त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज भरुन घेताना या प्राथमिक गोष्टींची तपासणी करणे आवश्यक असते. तसेच बहुतांश वेळा सूचक असलेली व्यक्ती निवडणूक अधिकाऱ्यासमोरच सही करते. माझ्या मुलाने सूचक म्हणून माझ्या  उमेदवारी अर्जावर सही केली होती. तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सूचक कोण आहे, असे विचारले होते. मात्र, आता सूचक असलेल्या व्यक्तीच्या रकान्यात असलेली सही गायब झाली आहे. त्यासाठी निवडणूक कार्यालयातील सीसीटीव्ही तपासले पाहिजेत, अशी मागणी उज्ज्वला थिटे यांनी केली. 

Continues below advertisement

आणखी वाचा

अनगरकर पाटलांचा पळपुटेपणा पुन्हा सिद्ध झाला; उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, उमेश पाटलांची जहरी टीका