सिंधुदुर्ग: राज्यातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीत शनिवारी भराडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भराडी देवीच्या दर्शनाला होणारी राजकारण्यांची गर्दी हेदेखील आंगणेवाडीच्या जत्रेचे (Anganewadi Jatra) वैशिष्ट्य मानले जाते. त्यानुसार शनिवारी आंगणेवाडीत अनेक राजकारण्यांनी देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार वैभव नाईक यांनी भराडी आईला (Bharadi Devi) राजकीय नवस बोलला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे, असा नवस वैभव नाईक यांनी केला. तर कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने आई भराडी चरणी नारळांच्या तोरणाची माळ अर्पण केली. कोकण रेल्वे मार्गावरील अनेक अडथळे, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा, कोकणातील जनतेला सुख समृद्ध मिळावे, असा नवस केला. गेली १४ वर्ष कोकण रेल्वे प्रवासी वाहतूक संघटनेकडून भराडी देवीला नारळाचे तोरण अर्पण केले जाते.


भाजपच्या मंडळींकडून मोदींच्या यशासाठी नवस


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही आज आंगणेवाडीत सपत्नीक येऊन भराडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी माजी खासदार निलेश राणे देखील उपस्थित होते. यावेळी नारायण राणे यांनी आई भराडी देवीचं दर्शन घेऊन चागले वाटल्याचे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील आई भराडी देवीच दर्शन घेतले, त्यांना यश लाभो. मी जे आजवर यश मिळविले ते आई भराडी देवीमुळे आहे. माझी देवीकडे मागणी की राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार रहावे. तसेच देशात मोदी सरकारने हॅटट्रिक करावी, अशी इच्छा व्यक्त केली. पक्षाने जाहीर केल्याशिवाय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत बोलणार नाही. जे पक्ष ठरवेल ते मला मान्य असेल, असे म्हणत आज नको पुढच्या वेळी नक्की सांगेन, असे नारायण राणे यांनी म्हटले. भाजप पक्ष या मतदार संघात आपले काम करतोय. गेली अनेक वर्ष निलेश राणे या मतदारसंघातून लढला आहे. त्यामुळे या मतदार संघावर भाजपचा हक्क आहे. या मतदारसंघावर वैयक्तिक दावा नसून पक्षाचा दावा असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.


मोदी सरकार लोकसभेला 400 जागा जिंकेल: आशिष शेलार


कोकणवासीयांचं आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्गातील मालवण मधील आगणेवाडी भराडी देवीची यात्रा पहाटेपासून सुरू झाली आहे. आई भराडी देवीच दर्शन घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, माजी खासदार निलेश राणे यांनी एकत्रित आई भराडी देवीच दर्शन घेतले. त्यानंतर भाजपचे आशिष शेलार यांनी देखील आई भराडी देवीच दर्शन घेतले. यावेळी आशिष शेलार यांनी आमचे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार असून आई भराडी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. देशात मोदी सरकार यावेळी ४०० पेक्षा जास्त जागा जिंकतील अशी प्रतिक्रिया शेलार यांनी दिली.


आणखी वाचा


भराडी देवीच्या यात्रेसाठी लावलेले मुख्यमंत्र्यांचे बॅनर अज्ञाताने फाडले, उद्यापासून आंगणेवाडी यात्रेला सुरुवात