Amit Thackeray Mahim Vidhan Sabha: माहीम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर (Sada Sarvankar) आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून माहीम विधानसभेची चर्चा रंगली आहे, कारण याच मतदारसंघातून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत.
अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने सदा सरवणकर यांच्यावर आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव वाढत असल्याचं दिसून येत आहे. मात्र मी उमेदवारी अर्ज भरणार, निवडणूक लढवणार आणि जिंकणार, असा विश्वास सदा सरवणकर यांनी बोलावून दाखवला. याचदरम्यान सदा सरवणकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी एबीपी माझाशी बोलताना अमित ठाकरेंना टोला लगावला.
आमच्या पाठिंब्याच्या चर्चा या फक्त मीडियातच होत्या. आमचं तर पहिल्या यादीत नाव होतं. आम्ही तयारीही केली होती. अमित ठाकरे म्हणत आहेत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मूळात ते नवीन आहेत. त्यांना अजून शिकायला फार वेळ आहे. या मतदार संघात अनेक वर्ष शिवसेनेचा भगवा हा डौलाने फडकत आहे. यंदाच्या निवडणुकीत देखील भगवा फडकेल, असा विश्वास समाधान सरवणकर यांनी बोलून दाखवला. तसेच सदा सरवणकर यांनी माहीमधील अनेक प्रश्न सोडवले आहेत, असं समाधान सरवणकर यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी 25 कोटी रुपये जाहीर केले आहेत- समाधान सरवणकर
माहीममधील प्रश्न जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये जावं लागतं आणि आता ते लोकांमध्ये 100 टक्के जातील अशी खात्री आहे. तसेच निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम दादर-माहीममधील समुद्रकिनाऱ्याचा प्रश्न मार्गी लावणार, असं अमित ठाकरेंनी सांगितले. यावर देखील समाधान सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली. फक्त समुद्रकिनारा साफ करुन होणार नाही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्रकिनऱ्यासाठी आधीच यासाठी 25 कोटी रुपये जाहीर केले आहेत, ते काम देखील सुरु झालंय, अशी माहिती समाधान सरवणकर यांनी दिली.
राज ठाकरेंना पाठिंबा देणं आमचं काम- दीपक केसरकर
दरम्यान, माहीम विधानसभेतून मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून विद्यामान आमदार सदा सरवणकर, शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांच्यात लढत होणार आहे. अमित ठाकरे रिंगणात उतरल्याने महायुतीमधील अनेक नेत्यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत भूमिका मांडली आहे. मात्र, सदा सरवणकर यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास नकार दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेला एकही जागा न घेता महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आमचेही कर्तव्य आहे की, अमित ठाकरे यांना पाठिंबा देणे. मात्र, तिथे आमचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्याशी बोलणे सुरू आहे. त्यांचा योग्य तो मान राखून सन्मान दिला जाईल. या ठिकाणी तोडगा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काढणार आहेत. अमित ठाकरेंना पाठिंबा देणं काम आहे, राज ठाकरेंना पाठिंबा देणं आमचं काम आहे, असं विधान मंत्री दीपक केसरकर यांनी केलं. दीपक केसरकरांच्या या विधानामुळे महायुती अमित ठाकरेंना पाठिंबा देणार का?, तसेच सदा सरवणकर निवडणुकीतून माघार घेणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.