पालघर: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना शिंदे गटाचे पालघर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांच्या नाराजीची सध्या प्रचंड चर्चा रंगली आहे. शिंदे गटाकडून विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे श्रीनिवास वनगा प्रचंड दुखावले गेले होते. प्रसारमध्यमांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना त्यांना रडू कोसळले होते. उमेदवारी न मिळाल्यामुळे श्रीनिवास वनगा (Srinivas Vanaga) हे प्रचंड मानसिक तणावाखाली होते. त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली होती. सोमवारी संध्याकाळी ही सगळी माहिती समोर आली होती. तेव्हापासून श्रीनिवास वनगा हे बेपत्ता आहेत.
श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी सात ते साडेसातच्या सुमारास श्रीनिवास वनगा एक पिशवी घेऊन घरातून बाहेर पडले. त्यांनी घरातून बाहेर पडताना आपण कुठे जातोय, हे कोणालाही सांगितले नाही. त्यानंतर आता 12 तास उलटून गेल्यानंतर श्रीनिवास वनगा नेमके कुठे आहेत, याचा पत्ता कोणालाही नाही. त्यांचे दोन्ही मोबाईल फोनही नॉट रिचेबल लागत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. परिणामी श्रीनिवास वनगा यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, सध्या श्रीनिवास वनगा यांच्या घराबाहेर मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काल संध्याकाळपासून त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे. काल माकपचे आमदार विनोद निकोले त्यांच्या घरी येऊन गेले. तसेच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पंकज देशमुखही वनगा यांच्या घरी गेले होते. यानंतर श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीला शंभुराज देसाई आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन येऊन गेला. यावेळी फोनवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी श्रीनिवास वनगा यांना विधानपरिषदेवर पाठवू, असे आश्वासन त्यांच्या पत्नीला दिल्याचे समजते.
पालघरमधून राजेंद्र गावितांना उमेदवारी
पालघर विधानसभेसाठी श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी शिंदे गटाने माजी खासदार राजेंद्र गावित यांना संधी दिली होती. राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वनगा यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, सोमवारी संध्याकाळी शिंदे गटाची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये नाव नसल्याने श्रीनिवास वनगा यांच्या संयमाचा बांध फुटला होता. गेल्या दोन दिवसांपासून ते स्थानिक नेत्यांशी संपर्क साधताना रडत आपली फसवणूक झाल्याचे सांगत होते. 'उद्धव ठाकरे हे देवमाणूस होते. मी घातकी माणसासोबत गेलो आणि माझा घात झाला', असे श्रीनिवास वनगा यांनी म्हटले होते.
आणखी वाचा