Devendra Fadnavis On Amit Thackeray मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अमित ठाकरेंची चांगलीच चर्चा रंगली आहे. माहीम विधानसभेतून मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून विद्यामान आमदार सदा सरवणकर, शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांच्यात लढत होणार आहे. अमित ठाकरे रिंगणात उतरल्याने महायुतीमधील अनेक नेत्यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत भूमिका मांडली आहे. मात्र सदा सरवणकर यांनी माघार न घेता उमेदवारी अर्ज देखील दाखल केला.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली. अमित ठाकरेंना मदत केली पाहिजे असं स्पष्ट मत भाजपचं आहे. आम्हाला लोकसभेत राज ठाकरेंनी पाठींबा दिला होता. त्यामुळे एका जागेवर ते मदत मागत असतील, तर ती द्यायला हवी, असं आमचं मत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मतही वेगळं नाहीय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
एकनाथ शिंदेंनी देखील प्रयत्न केला- देवेंद्र फडणवीस
मी स्वत: एकनाथ शिंदेंसोबत याविषयावर चर्चा केली. आम्ही चर्चा केली की एखादी जागा हवं तर अदलाबदल करु...एकनाथ शिंदेंनी प्रयत्न देखील केला. त्यावेळी तेथील उमेदवार सदा सरवणकर यांनाही बोलावलं होतं. यावर शिवसेनेच्या नेत्यांनी मत मांडली की, आपण जर जागा लढवली नाही, तर ती मत थेट ठाकरे गटाला जातील. मात्र आमचं आजही मत आहे, अमित ठाकरेंना मदत करायला हवी, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
बाळासाहेबांनी दिलेलं हिंदुत्व उद्धव ठाकरे यांनी कधीच हरवलं- देवेंद्र फडणवीस
आमच्या हिंदुत्वाबद्दल बोलायची गरज नाही. स्वर्गीय बाळासाहेबांनी दिलेलं हिंदुत्व उद्धव ठाकरे यांनी कधीच हरवलं. आदित्य ना हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही बरोबर आहे, कारण त्यांना शिकवण्यासाठी अबू आझमी आहेत. बाळासाहेबांना जनाब म्हटलं जातं, जे हिंदुत्व बाळासाहेबांचे होते, शिवसेनेचे होते ते हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी संपवलं, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. तसेच ना मला ठाकरे संपवू शकतात, ना मी त्यांना संपवू शकत. कोणाला संपवायचं हे जनता ठरवते, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.