Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभेच्या कामठी मतदारसंघाच्या रिंगणात पाच वर्षांच्या अंतराने उतरलेले भाजपचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या संपत्तीत तब्बल 39 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बावनकुळे आणि त्यांच्या पत्नीच्या नावे 48 कोटींहून अधिकची संपत्ती असतानादेखील बावनकुळे यांच्या नावाने वैयक्तिक कार नाही.
एकूण 90 लाखांहून अधिकची चल संपत्ती
2021 साली बावनकुळे यांनी विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यावेळी बावनकुळे आणि त्यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांच्या नावे मिळून एकूण 90 लाखांहून अधिकची चल संपत्ती होती, तर 33 कोटी 83 लाख 77 हजार 117 रुपयांची अचल संपत्ती होती. मात्र, काल अर्ज दाखल करताना बावनकुळे यांनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार बावनकुळे आणि त्यांच्या पत्नीच्या नावे एकूण 2.63 कोटींची चल संपत्ती आहे, तर 45.92 कोटींची अचल संपत्ती आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे 2 कोटी 10 लाखांची अचल संपत्ती आणि 86 लाख 76 हजार रुपयांची चल संपत्ती आहे.
कर्जाचा आकडादेखील वाढला
2019 साली बावनकुळे आणि त्यांच्या पत्नीवर 17 कोटी 42 लाख 58 हजार 265 इतक्या रकमेचे कर्ज होते. आता त्यात वाढ झाली असून, बावनकुळे आणि त्यांच्या पत्नीवर 20 कोटी 24 लाख रुपयांचे कर्ज आहे. दररम्यान, बावनकुळे यांच्याविरोधात विविध प्रकारचे चार खटले प्रलंबित असल्याची माहिती बावनकुळे यांनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार पुढे आली आहे.
पाच वर्षांपूर्वी उमेदवारी नाकारण्यात आलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याच स्वाक्षरीचा बी फॉर्म घेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, यावर बोलताना फार कमी कार्यकर्त्यांच्या जीवनात असा प्रसंग येतो, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे. पाच वर्षांपूर्वी राजकीय जीवनात एक कठीण प्रसंग आला होता, जेव्हा पक्षाने उमेदवारी नाकारली होती, मात्र, त्याच्यातून बरेच काही शिकून आम्ही पुढे गेले आहोत, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांनी दिली आहे.
राजकीय जीवनात असे प्रसंग येतात. मात्र संयम ठेवलं पाहिजे, असेच आवाहन सर्व भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना करेल असेही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले. तसेच राज्यात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील हे बावनकुळे यांनी मान्य केले आहे. मात्र राज्यात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील हे बावनकुळे यांनी मान्य केले आहे. ज्या -ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल त्या जागांची घोषणा महायुतीकडून केली जाईल अशी माहिती ही त्यांनी दिली. लवकरच महायुतीचा संयुक्त जाहीरनामा सर्वांसमोर येईल आणि त्यानंतर महायुतीच्या संयुक्त सभा ही सुरू होतील, असेही बावनकुळे म्हणाले.
हे ही वाचा