मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी केलेल्या हल्ल्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दिल्लीतील हिवाळी अधिवेशनात अमित शाह यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी रान उठवलेलं असताना दुसरीकडे महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतही विरोधकांनी यावरून सत्ताधारी सरकारवर हल्लाबोल केला. संसदेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कामकाज तहकूब करण्याचीही वेळ आली. अमित शाह यांनी केलेल्या विधानाबाबत विरोधकांच्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणालेत पंतप्रधान नरेंद्र मोदी?
“काँग्रेस आणि त्यांच्या भ्रष्ट व्यवस्थेला वाटत असेल की त्यांच्या अपप्रचारामागे गेल्या अनेक वर्षांपासून ते करत असलेले गैरप्रकार लपवू शकतात, विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्यासारखे प्रकार, तर ही त्यांची मोठी चूक ठरणार आहे. भारतीय नागरिकांनी वेळोवेळी पाहिलं आहे, कसं एका कुटुंबाच्या ताब्यात असणाऱ्या एका पक्षानं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा पुसून टाकण्यासाठी आणि अनुसूचित जाती-जमातींचा अवमान करण्यासाठी शक्य त्या सर्व गोष्टी केल्या”, असं नरेंद्र मोदींनी केलेल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
मोदींनी दिली यादी, काँग्रेसवर आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पोस्ट्समध्ये यादीच दिली असून त्यामध्ये काँग्रेस पक्षानं कशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला, यासंदर्भात दावे केले आहेत. “एकदा नसून दोनदा बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकांमध्ये पराभव करणं, पंडित नेहरूंनी डॉ. आंबेडकरांविरोधात प्रचार करणं आणि त्यांचा पराभव मोठा मुद्दा बनवणं, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘भारतरत्न’ नाकारणं, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं पोर्ट्रेट लावण्यास नकार देणं या गोष्टींद्वारे काँग्रेसने डॉ. आंबेडकरांचा अवमान केला आहे”, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढे म्हटलं आहे.
'काँग्रेसने एससी-एसटीसाठी काहीही केले नाही'
काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी एससी-एसटी समुदायांविरुद्ध सर्वात भीषण हत्याकांड त्यांच्या राजवटीत झाले हे ते नाकारू शकत नाहीत. ते वर्षानुवर्षे सत्तेत राहिले, परंतु एससी आणि एसटी समुदायांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी काहीही ठोस केले नाही.
"काँग्रेस पाहिजे तेवढा प्रयत्न करून शकते, पण काँग्रेस हे नाकारू शकत नाहीत की अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींविरोधातील भीषण हत्याकांड हे त्यांच्याच काळात झालं आहे". काँग्रेस अनेक वर्षं सत्तेत राहिली आहे. पण त्यांनी एससी-एसटी समुदायाच्या सक्षमीकरणासाठी विकासासाठी ठोस असं काहीही केलेलं नाही”, असंही मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.पीएम मोदींनी पुढे म्हटलं आहे की, 'संसदेत गृहमंत्र्यांनी डॉ. आंबेडकरांचा अपमान करण्याचा आणि एससी-एसटी समुदायांकडे दुर्लक्ष केल्याचा काँग्रेसचा काळा इतिहास उघड केला. यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. त्यामुळे ते आता नाटक करत आहेत. हे अत्यंत दुःखद आहे. लोकांना सत्य माहीत आहे,अशा शब्दांत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं.
सरकारच्या कामाची गणना
आपण आज जे आहोत ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळेच असल्याचे ते म्हणाले. बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्या सरकारने गेल्या दशकभरात अथक परिश्रम केले आहेत. कोणतेही क्षेत्र घ्या, 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढणे, एससी-एसटी कायदा मजबूत करणे, स्वच्छ भारत, पीएम आवास योजना, जल जीवन मिशन, उज्ज्वला योजना आणि बरेच काही यासारखे आपल्या सरकारचे प्रमुख कार्यक्रम...यातील प्रत्येकाने गरीब आणि उपेक्षितांच्या जीवनाला हातभार लावला आहे. आमच्या सरकारने पंचतीर्थ, डॉ. आंबेडकरांशी संबंधित पाच प्रतिष्ठित ठिकाणे विकसित करण्याचे काम केले आहे. चैत्यभूमीसाठी जमिनीचा प्रश्न अनेक दशकांपासून प्रलंबित होता.आमच्या सरकारने हा प्रश्न तर सोडवलाच पण मी तिथे प्रार्थना करायलाही गेलो होतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'आम्ही दिल्लीतील 26, अलीपूर रोड देखील विकसित केला आहे, जिथे डॉ. आंबेडकरांनी त्यांची शेवटची वर्षे घालवली. ते लंडनमध्ये ज्या घरात राहत होते, ते घरही भारत सरकारने ताब्यात घेतले आहे.
काँग्रेसने अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी केली
याआधी बुधवारी काँग्रेसने अमित शाह यांच्यावर संविधान निर्माता बाबासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि देशाची माफी मागावी, असे म्हटले आहे.